चंद्रपूर : शहरातील तुकुम परिसरात सट्टेबाजाकडून क्रिकेट सामन्यांवर पैशाची बाजी लावून जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका सट्टेबाजाला ताब्यात घेतले. तर, अन्य एक फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देविदास दिलीप पडगीलवार (वय ३२) असे अटकेतील सट्टेबाजाचे, तर अविनाश हांडे (वय ३७) असे फरार सट्टेबाजाचे नाव आहे.
आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर सट्टेबाज सक्रिय झाले आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सट्टेबाजांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. तुकुम परिसरातील शिवाजीनगर राधाकृष्ण शाळेमागे राहणारे देविदास पडगीलवार हा आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्याव पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी मोबाईलवर सट्टा चालवित असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल, टीव्ही, रोख रकम व अन्य साहित्य असा एकूण ३० हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देविदास दिलीप पडगीलवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्याचा साथीदार अविनाश हांडे (रा. ताडबन वॉर्ड) याचा पोलिस शोध घेत आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रवींद्र पंधरे यांच्या पथकाने केली.






