चंद्रपूर : भारत जोडो यात्रेच्या यशप्राप्तीनंतर आपल्या काँग्रेस पक्षातर्फे हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात झाली आहे. अभियान पुर्ण दोन महीने म्हणजेच 26 मार्च पर्यंत सुरु राहील. या अभियानाच्या माध्यमातुन काँग्रेस ची विचारधारा त्याचप्रमाणे देशात श्रीमंत आणि गरीब यांमध्ये वाढत चाललेली दरी, महागाई, महिलांवर होणारे अत्याचार यासारखे विषय लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी हाथ से हाथ जोडो हे अभियान म्हणून नव्हे तर लोकचळवळ व्हावी याकरीता आपल्याकडून काम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
या हाथ से हाथ जोडो अभियानात प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकारी डोअर टू डोअर जाऊन पदयात्रेच्या माध्यमातुन राहुलजींचा संदेश जनतेला देतील. यात मोदी सरकारच्या अपयशाबद्दल, देशाला संकटाच्या खाईत ढकल्याबद्दल, धर्माधर्मात द्वेष पसरविल्याबद्दल जनतेला जाणीव करुन द्यायची आहे. महागाई, बेरोजगारी हा आपला मुख्य मुद्दा असेल. देशस्तरीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा त्रिस्तरीय चालणाऱ्या या अभियानात संपुर्ण देशातील जनता काँग्रेस सोबत जोडल्या जाईल व काँग्रेस पक्षाचा जनाधार निश्चितपणे मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेस अहिंसावादी असून महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे दंडे ठेवणारे, दंडे चालविण्याचे प्रशिक्षण देणारे विचार देशाला विनाशाकडे घेऊन जातील. म्हणून सर्व भारतीयांना देशवासीयांना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हाथ से हाथ जोडो अभियानातुन जनजागरण करणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय नळे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव, युवक काँग्रेस युवा अध्यक्ष राजेश अडूर, माजी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष गौर, महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती फायदेशीर ठरावी यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविले जात आहे. आपण जे बोलतो ते करतो. नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघातील नवनियुक्त आमदार सुधाकर अडबाले यांच्या रूपाने जिल्ह्याला नवीन काँग्रेसच्या हक्काच्या आमदार मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे बळ चंद्रपूर शहरापासून ते जिल्ह्यात देखील वाढले आहे. हे वर्ष निवडणुकांचे असून या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला निश्चितपणे भरीव यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासोबत याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.