यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

519

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) यूजीसी नेट ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर २०२१ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षांचे सत्र सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे. उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी आता उमेदवारांसाठी ३० मे ही अंतिम मुदत असेल, असे प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. उमेदवारांना अधिक माहिती  ugcnet.nta.nic.in  या संकेतस्थळावर मिळेल.