ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित फेसबुकचे मेटाविश्व

272

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नुकतेच फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या कंपनी समूहाचे नाव “मेटा” असे घोषित केलेले आहे. त्यामुळे आता फेसबुक समूहाला मेटा नावाने ओळखले जात आहे. मेटा या शब्दाचा अर्थ “त्या पलीकडचे” “आणखी पलीकडचे” म्हणजे “जेथे आपली विचारशक्ती पोहचू शकत नाही” असे. म्हणजे फेसबुक आता केवळ सोशल मिडियापुरते मर्यादित राहणार नसून नवतंत्रज्ञानासाठी सज्ज होत आहे. नवतंत्रज्ञानाच्या संकल्पनेवर मार्क झुकरबर्ग यांनी ‘मेटाव्हर्स’ या प्रकल्पाला मोठ्या जोमाने सुरुवात केली असून त्यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करणार असून दहा हजार नवीन मनुष्यबळ नेमले जाणार आहे. यामुळे ‘मेटाव्हर्स’ हा शब्द इंटरनेटवर अनेकांकडून शोधला गेला आहे.

यापूर्वी आपण ‘युनिव्हर्स’ शब्द अनेकदा ऐकला आहे. संपूर्ण विश्वाला संबोधण्यासाठी ‘युनिव्हर्स’ या शब्दाचा वापर सामान्यता केला जातो. येत्याकाळात ‘युनिव्हर्स’ प्रमाणे ‘मेटाव्हर्स’ हा शब्द फारच वेगाने लोकप्रिय होणार असून चर्चेचा विषय बनणार आहे. ‘मेटाव्हर्स’ म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित आभासी विश्व (व्हर्चुअल वर्ल्ड). डिजिटल तंत्रज्ञानामुळे हल्ली आपण मोबाईलद्वारे बोलणे, ऐकणे व पाहणे या तीन क्रिया प्रामुख्याने करीत आहे. परंतु फेसबूकच्या नवतंत्रज्ञानामुळे ‘मेटाव्हर्स’ च्या आभासी विश्वात आपणाला दैनंदिन जीवनाप्रमाणे जगता येणार आहे. म्हणजेच एखाद्या पदार्थाला स्पर्श करता येणार, त्यांची चव आणि वास सुद्धा घेता येणार आहे. तसेच या आभासी विश्वात आपणाला सर्व व्यवहार सुद्धा करता येणार आहे. जसे प्लॉट, घर, गाडी, विमान खरेदी-विक्री सुद्धा करता येणार आहे. हे सर्व व्यवहार क्रिप्टोकरंसी म्हणजे आभासी चलनाद्वारे करता येणार आहे. कारण आभासी चलन हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाधारित असून डिजिटल व्यवहारांकारिता सर्वात सुरक्षित आहे. याकरिता ‘मेटाव्हर्स’ द्वारे काही ठराविक क्रिप्टोकरंसीचा वापर करण्यात येणार असून त्यास ‘मेटाव्हर्स क्रिप्टोकरंसी’ असे ओळखले जात आहे. हे सर्व करण्यासाठी ‘मेटाव्हर्स’ आर्टीफिशीयल इंटेलीजेंस, थ्री-डी, वर्चुअल रिआलिटी, ब्लॉकचैन तंत्रज्ञान, क्रिप्टोकरंसी, इंटरनेट आदीचा उपयोग करण्यात येणार आहे.

२००९ साली ‘अवतार’ हॉलीवूड प्रदर्शित सायन्स फिक्शन सिनेमा आपण बघितला असेल. त्या सिनेमातील पात्र काल्पनिक होती मात्र सामान्य विश्वासारखे ते विश्व आपणास भासत होते. अलीकडे पब्जी या गेम मध्ये आपण व्हर्चुअल ध्वनीद्वारे संवाद साधून तो गेम सोबत खेळत असतांना सोबत असल्याचे भासत असल्याने हा गेम फारच लोकप्रिय झाला. त्याचप्रमाणे ‘मेटाव्हर्स’ अश्याच 3D तंत्रज्ञानाद्वारे आभासी विश्व निर्माण करीत आहे. या आभासी विश्वात प्रवेश करण्यासाठी ‘मेटाव्हर्स’ एक विशेष यंत्र म्हणजे व्हर्चुअल रिआलिटी (डिव्हाईस) बनवणार आहे. या नवतंत्रज्ञानामुळे एक नवीन ऑनलाइन स्पेस तयार होईल. याद्वारे लोक खऱ्या जगाप्रमाणेच एकमेकांशी संवाद साधू शकतील. याद्वारे तुम्ही एका आभासी जगात जाऊ शकता येणार. येथे मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी बोलू शकता, त्यांच्यासोबत फिरू शकता. शॉपिंग करता येईल, घर-गाडी खरेदी करून खऱ्या जगाप्रमाणेच वापरू शकता येईल. तसेच या तंत्रज्ञानाचा डिजिटल जाहिरात आणि व्यवसायांना लाभ होणार आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष ‘मेटाव्हर्स’ कडे आहे.

लेखक : निकेश पिणे