दिनेश मंडपे (नागपुर जिल्हा प्रतिनिधी)
नागपूर : नागपूर पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील गजबजलेल्या मार्केटमधील एका लॉजमध्ये हा सर्व गैरप्रकार सुरु होता. पोलिसांना या गैरप्रकाराची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच माहितीच्या आधारावर तपास केला. तपासादरम्यान संबंधित माहिती खरी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवाई केली. यासाठी पोलिसांनी गनिमी कावा करत आरोपीला रंगेहात पकडलं. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर एका तरुणीची सुटका केली आहे. पोलिसांच्या या कामाचं शहरात कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये सीताबर्डी परिसरात मोठी मार्केट आहे. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. तसेच संबंधित परिसर हा मार्केट परिसर म्हणूनच ओळखला जातो. मात्र याच मार्केट परिसरात असलेल्या नूतन लॉजमध्ये विकृत कृत्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होते. या लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून देहविक्रीचा व्यवयास सुरु होता. अखेर नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिसांनी सापळा रचला
नागपूर पोलिसांनी सुरुवातीला गनिमी कावा पद्धतीने संबंधित परिसरात जावून पाहणी केली. तिथे पोलिसांना काही संशयास्पद घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर काही खात्रीलायक सुत्रांकडून माहिती मिळवली. त्यानंतर संबंधित प्रकार खरा असल्याचं पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपींना रंगेहाथ पकडण्याचं ठरवलं. त्यानुसार एक पोलीस कर्मचारी संबंधित लॉजमध्ये ग्राहक म्हणून गेला. तिथे त्यांनी बातचित करत व्यवहार निश्चित केला.
पोलिसांचा तपास सुरु
लॉजमध्ये गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने योग्यवेळी संधी साधत बाहेर असलेल्या पोलिसांना सूचना देत आतमध्ये बोलावलं. अशाप्रकारे पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडलं. तर एका तरुणीची यातून सुटका करण्यात आली. संबंधित व्यवसाय नेमका किती दिवसांपासून सुरु होता, त्यामध्ये नेमकं कोण-कोण गुंतलं आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहेत. पण अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना नागपूर पोलिसांकडून सुटका केली जाणार नाही, हेच या कारवाईतून दिसून येत आहे. पोलिसांचा सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.