‘करुणा’ हाच संविधानाचा सार आहे – पत्रकार मंदार फणसे

0
222

नागपूर: राष्ट्र किंवा देश कोणत्याही विचारधारेच्या अनुषंगाने समजून घेत असताना ‘भारत’ या संकल्पनेकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणे अत्यावश्यक ठरते. भारत या संकल्पनेची भावना किंवा सूत्र हे ‘संविधान’ असून ‘करुणा’ हाच संविधानाचा सर्वात मोठा सार आहे असे प्रतिपादन पत्रकार मंदार फणसे यांनी केले.

संविधान फाऊंडेशन नागपूरच्या वतीने संविधान शाळेच्या एकोणिसाव्या संवादात ‘संविधानाचे सार आणि आजचा द्वेषाने भारलेला काळ’ या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. नेहा खोब्रागडे यांनी संवादाचे सूत्रसंचालन करीत संविधान फाऊंडेशनची भूमिका व संविधान शाळेची संकल्पना स्पष्ट केली. प्रारंभी निर्जरा मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान शाळेच्या संवादास सुरुवात केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एखादा विचार किंवा व्यक्ती न पटणे, त्याचा द्वेष वाटणे, त्या विषयीची भावना तीव्र होणे, हे शक्य आहे. मात्र या भावनेकडे करूणेने पाहिल्यास त्या विचाराला किंवा व्यक्तीला समूळ नष्ट करण्याची भावना दूर होऊन त्यास समजून घेण्याची अनुभूती निर्माण होते.

अंधाराकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आपणास संविधान देते. संविधानात द्वेषमूलक भावना नाही, हे संविधानाचे सौंदर्य आहे. समुदाय, जात, धर्म आणि वेगवेगळ्या आधारावर निर्माण होणारी द्वेषभावना आणि त्यातील हिंसा अराजकता निर्माण करीत असून ते थांबविण्यासाठी संविधानाचा सार असलेल्या करुणेचा प्रचार-प्रसार हे देशातील सर्व घटकांमध्ये होणे गरजेचे आहे. भीतीने जगणं हे जगणे नव्हे.

भीती ही जगण्यासाठी अयोग्य गोष्ट आहे. करूणेपासून दूर जाणे म्हणजे संविधानापासून दूर जाणे होय. हे भयावह आहे. येणाऱ्या काळात संविधानाचा सार आणि त्यातील भावनिकता समजून घेऊन त्यातील मूल्ये सोप्या शब्दात सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. संविधान हेच भारतात सर्वोच्च आणि सर्वव्यापी आहे. संविधानाच्या अस्तित्वाची जाणीव पदोपदी करून द्यावी लागेल. द्वेषाने भारलेला काळ संपवायचा असेल तर संविधान समजून घेण्याची आणि जगण्याच्या मूल्यांमध्ये संविधानिकतेचा आग्रह अधिक गतिमान करण्याची गरज आहे, असे मार्मिक विचार पत्रकार मंदार फणसे यांनी व्यक्त केले.

संविधान शाळेत बोलताना माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, सर्वच क्षेत्रात द्वेषाची भावना वाढत आहे. ज्यांच्या हातात संविधान आणि कायदा अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, तेच खूप गोंधळ घालत आहेत. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभाव द्विगुणीत करून व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता निर्माण करण्याचा विचार संविधानात आहे. मात्र, माणसं जोडण्यापेक्षा माणसामाणसात भेद निर्माण करण्याचे संविधानविरोधी काम आज होत आहे.

राजकारणाचे आणि नोकरशाहीचे गुन्हेगारीकरण लक्षात घेता, सत्य कोण मांडेल? हा मोठा प्रश्न आहे. संविधानाच्या मूल्यांचा सन्मान करुन त्याप्रमाणे आचरण होणे गरजेचे असताना समाजात मात्र श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदाभेद, तु-तु, मै-मै अशी द्वेषभावना मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात आहे. सत्ता खोटं बोलून कारभार करीत असेल तर ते संविधानाच्या विपरीत आहे. संविधानाच्या रक्षणासाठी न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांची प्रभावी भूमिका असणे गरजेचे आहे असे विचार इ. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here