जादूटोणा संशय प्रकरण ; ०९ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी तर ०४ ची पोलीस कोठडी…शरीरावरील जखमा तर भरतील परंतु मानसिक आघाताचे काय?

0
596

दिपक साबने,जिवती

जादूटोना, करणी केल्याच्या संशयातून ७ वयोवृद्ध लोकांना गावातील चौकात दोरीने हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यापैकी ५ जनाला गंभीर दुखापत झाली आहे त्यात काहींचे हाड देखील मोडले आहे. या घटनेमुळे सर्व लोकांवर मानसिक आघात झाला आहे. शारीरिक जखमा एक न एक दिवस भरून निघतील परंतु या घटनेतून निरपराध लोकांवर जो मानसिक आघात बसला आहे तो कधी भरून निघेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात जादूटोण्याच्या संशयावरून ७ जणांना भर चौकात लाकडाच्या खांबाला दोरीने हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे. १) शांताबाई भगवान कांबळे वय ५३ वर्षे, २) शिवराज कांबळे वय ७४ वर्षे, ३) साहेबराव एकनाथ हुके वय ४८ वर्षे, ४) धम्मशिला सुधाकर हुके वय ३८ वर्षे, ५) पंचफुला शिवराज हुके वय ५५ वर्षे, ६) प्रयागबाई हुके वय ६४ वर्षे, ७) एकनाथ हुके वय ७० वर्षे
शनिवारी वणी खुर्द या गावात दोन महिलांच्या अंगात अचानक देवी संचारली. गावावर काही लोकांनी करणी केली असे सांगत त्या दोन महिलांनी पीडित लोकांची नावे घेतली त्या सर्व लोकांना गावातील चौकात आणण्यात आले, त्यांचे सर्वांचे दोरीने हातपाय बांधण्यात आले आणि त्यांना जबर मारहान करण्यात आली. सदर घटनेची माहिती जिवती पोलीस यांना कळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी सुद्धा मारहाण सुरूच होती अखेर शर्थीच्या प्रयत्नांनी पीडितांना गावकर्यांच्या तावडीतून सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले.
पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपी सुग्रीव रामाराव शिंदे, बालाजी कांबळे, दादाराव कोटबे, गोविंद संभाजी येरेकर, केशव श्रावण कांबळे, माधव तेलंगे, दत्ता शिवाजी भालेराव, सुरज कांबळे, सिद्धेश्वर शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटबे, अमोल शिंदे, संतोष पांचाळ या १३ जणांना अटक करून राजुरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी संतोष पांचाळ, प्रकाश कोटबे, दत्ता कांबळे, अमोल शिंदे यांना पोलीस कोठडी सूनवण्यात आली. तर उर्वरीत सुग्रीव रामाराव शिंदे, बालाजी कांबळे, दादाराव कोटबे, गोविंद संभाजी येरेकर, केशव श्रावण कांबळे, माधव तेलंगे, दत्ता शिवाजी भालेराव, सुरज कांबळे, सिद्धेश्वर शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या घटनेमुळे गावात तसेच महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती गावात तणाव निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला जबर धक्का बसला आहे. त्याच बरोबर ज्यांना मारहाण झाली त्यांना मानसिक आघात पोहोचला आहे. पुढील तपास सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात संतोष अंबिके, सहा पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन जिवती हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here