सततची नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या..

471

राजुरा तालुका प्रतिनिधी (राकेश कडुकर)

सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील विरूर स्टेशन जवळ असलेल्या धानोरा येथिल युवा शेतकरी राजु पारखी ह्या शेतकऱ्याने निराशेतून व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक 7 ऑगस्ट 2021 च्या रात्री घरीच विष प्राशन केले. मात्र घरच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मात्र त्याची प्राणज्योत मालवली.

काही वर्षा पासुन सुरु असलेली नापिकी, कोरोना काळात आलेली आर्थिक चणचण व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याचा भार सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाउल उचलले. ह्यावर्षी उमेदीने त्याने शेतात पेरणी केली होती मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी शिरले व डौलदार होत असलेले पीक अचानक वाहुन गेले त्यामुळे राजु पारखी सतत काळजीत होता. मात्र डोक्यावर असलेले कर्ज व शेताचे झालेले नुकसान ह्यामुळे त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.