कोणताही पात्र विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये – अतुलकुमार खोब्रागडे

0
1138

नागपूर: शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात आर्थिक सहाय्याची रक्कम जमा करण्याची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ दि. 6 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आली असली तरी सामाजिक न्याय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो पात्र विद्यार्थी वंचित राहिले आहेत. तेव्हा, कोणताही पात्र विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची काळजी शासनाने घ्यावी, असे आवाहन ‘खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीनेच’ संघटनेचे अतुलकुमार खोब्रागडे यांनी केले.

संविधान फाऊंडेशनच्या वतीने संविधानाच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या ‘संविधानाची शाळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या तेराव्या संवादात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : धोरण व अंमलबजावणीचे वास्तव’ या विषयावर प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अतुलकुमार खोब्रागडे यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे उपस्थित होते. प्रारंभी प्रितिष निरंजन यांनी संविधान प्रास्ताविका वाचन करून संवाद कार्यक्रमास सुरुवात केली. प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी संविधान फाऊंडेशनची भूमिका व संविधान शाळेची संकल्पना विशद केली.

पुढे बोलताना अतुलकुमार खोब्रागडे म्हणाले की, राज्यात एकूण 441 शासकीय वसतिगृह असून त्यापैकी 224 वसतिगृह शासकीय इमारतीत तर 217 वसतिगृह अद्यापही भाड्याच्या इमारतीत आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात वसतिगृह व निवासी शाळा निर्माण करण्याच्या योजनेकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एकीकडे वसतिगृह निर्माण होत नाही तर दुसरीकडे वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जात नाही. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व जागेची मर्यादा लक्षात घेता हजारो विद्यार्थी वस्तीगृहापासून वंचित राहतात. अशा प्रत्येक विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ देण्यात यावा. स्वाधार योजनेतील त्रुट्या दूर करून सुधारित योजना अंमलात आणण्यात यावी, अशी मागणी अतुलकुमार खोब्रागडे यांनी यावेळी केली.

संवाद कार्यक्रमाचा समारोप करताना माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, सामाजिक न्याय विभाग हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांची फलनिष्पत्ती आहे. बाबासाहेबांच्या नावे तयार झालेल्या स्वाधार योजनेची प्रगती निराशाजनक असली तरी बार्टीच्या समता दूतांनी योजना अंमलबजावणीत लक्ष घातल्याने मागील दोन वर्षात थोडीफार प्रगती दिसून आली. मात्र ती पर्याप्त नाही. जे विद्यार्थी भारत सरकारच्या अनुसूचित जाती पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत व ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पात्र ठरवून या योजनेचा लाभ तालुका, जिल्हा व विभागस्तरावर आणि सरकारमान्य सर्व अभ्यासक्रमांसाठी देण्यात यावा. योजनेचा प्रचार-प्रसार करावा. प्राचार्यांकडून निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी घ्यावी तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय करावी. योजनेतील जाचक अटी व शर्ती दूर करून सुधारित योजना अंमलात आणावी. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी व जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने घ्यावी, असे आवाहन इ. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी केले.
*********

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here