HomeBreaking Newsमूलभूत विचाराला पारखा झालेल्या समाजाला संविधानाची ओळख- आमदार कपिल पाटील

मूलभूत विचाराला पारखा झालेल्या समाजाला संविधानाची ओळख- आमदार कपिल पाटील

नागपूर दि. ३ जुलै,

शाळेत होणारे संस्कार जीवनात खूप महत्वाचे ठरतात. संविधानाच्या अंमलबजावणी नंतरही बहुतांश शाळा अभिजनवादी संस्कृतीच्या प्रभावाखाली होत्या. शाळा-शाळांमधून संविधान प्रास्ताविका वाचन करण्याचा देशातील पहिला उपक्रम सुरु करुन संविधानाच्या मूलभूत विचारांना पारखा झालेल्या समाजाला संविधानाची ओळख करून देण्याचे महत्वाचे काम इ. झेड. खोब्रागडे यांनी केल्याचे कृतज्ञतापूर्वक विचार आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

संविधान फाऊंडेशनच्या वतीने संविधान जागृतीसाठी आयोजित केलेल्या संविधान शाळेच्या दहाव्या संवादात ‘शाळा/महाविद्यालयांमधून संविधान जागृती अभियानाची आवश्यकता’ या विषयावर प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी आमदार कपिल पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे उपस्थित होते. प्रारंभी आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे यांनी संविधान प्रास्ताविका वाचन करुन संवाद कार्यक्रमाची सुरूवात केली. संविधान फाऊंडेशनची भूमिका व संविधान शाळेची संकल्पना प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी विषद केली.

पुढे बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले की, आजची स्थिती भयावह आहे. शिक्षण आता खेडोपाडी पोहोचलेला असला तरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सगळा वंचित, उपेक्षित, शोषित, पीडित वर्ग अद्यापही समाविष्ट झाला नाही. महामारी काळात शाळा बंद आहेत. अॉनलाईन शिक्षण सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ऑनलाइन शिक्षणापासून ५०% विद्यार्थी वंचित आहेत. ३५% विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा इंटरनेट सुविधा नाहीत. खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागातील मुलांपर्यंत मोबाईल तर दूरच राहिला पण साधी स्वाध्याय पुस्तिका, वर्कशीट व ॲक्टिविटी बुक पोहचलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार दिला. पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी शिक्षणावर ६% खर्चाची अपेक्षा केली होती. तेव्हापासून आजतागायत २.५% हून अधिक शिक्षणावर खर्च झालेला नाही. आता शिक्षणाचे खाजगीकरण सुरू झाले आहे. शिक्षणामध्ये कंत्राटीकरण आलेला आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण सुरु झाले आहे. शोषित, पीडित, वंचित व अभावग्रस्त समाजास उच्च शिक्षणाच्या काही संधी उपलब्ध असल्या तरी शिक्षण परवडत नाही. वंचित वर्गातल्या मुलांनी कौशल्याचे शिक्षण घ्यावे. त्याच्या पलीकडे जाण्याची स्वप्नसुद्धा पाहू नये, अशी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे विदारक वास्तव आमदार पाटील यांनी यावेळी मांडले.

संवाद कार्यक्रमाचा समारोप करताना माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, संविधान जागृतीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते. शासन-प्रशासनातील काही लोकांचा संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे.
बहुजन वर्गातील शिक्षक मोठ्या संख्येने असूनही ऑनलाईन शिक्षणात संविधान प्रास्ताविका वाचली जात नसल्यास दोष कुणाला द्यायचा? देशाचे संविधान सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा संविधान शाळेच्या माध्यमातून आणि संविधान जागृतीच्या विविध उपक्रमातून आमचा प्रयत्न आहे. संविधान हा विषय सर्व अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात यावा, शिक्षकांना संविधानाचे प्रशिक्षण देण्यात यावे, गावांमध्ये समाजमंदिराऐवजी संविधान सभागृह व संविधान स्तंभ बांधण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती इ. झेड. खोब्रागडे यांनी आमदार कपिल पाटील यांना यावेळी चर्चा करताना केली. सुजान नागरिकांनी संविधान मित्र होऊन संविधान जागराच्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन इ. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी केले.
**********

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!