दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला साकडे….

1170

प्रीतम गग्गुरी प्रतिनिधी

गडचिरोली: जिल्ह्यात ऐतिहासिक दारूबंदी लागू असून, चंद्रपूरची दारूबंदी उठविल्यास गडचिरोलीच्या प्रभावी दारूबंदीला धोका आहे. त्यामुळे चंद्रपूरची दारुबंदी कायम ठेवून गडचिरोलीच्या दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या आवश्यक विभागांना जबाबदारी देण्यात यावी, अशी विनंती गडचिरोली, धानोरा व कुरखेडा या गावांनी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

तालुक्यांतील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना
गडचिरोली तालुक्यातील निवडक महिलांच्या वतीने १०२ गावांचे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने राज्य करता शिवरायांनी जनतेला दारू पाजली असती का? मग आपण चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारुबंदी का उठविली? आपले मंत्री गडचिरोली जिल्ह्यात येऊन येथील यशस्वी दारूबंदी उठविण्याची धमकी देऊन का जातात, ही शिवशाही की दारुशाही, असाही सवाल तालुक्यातील गावांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना हे निवेदन लवकर पाठवावे, अशी मागणी महिलांनी तहसीलदारांकडे केली. चंद्रपूरमध्ये जर दारू विक्री सुरु झाली तर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येऊन त्याचा उलट परिणाम होईल. जिल्ह्याच्या सीमेवर दुकाने सुरु होतील.
त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदी कायम ठेवून अंमलबजावणी अधिक कडक करण्यात यावी चंद्रपूर जिल्ह्यातून कोणतीही अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येणार नाही याची जबाबदारी शासनाने घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.