संवैधानिक नीतिमत्ता व मूल्य स्थापत्य अंगीकृत करणे गरजेचे- डॉ. वेदप्रकाश मिश्रा…

555

सुरज पि. दहागावकर (उपसंपादक)

नागपूर, संविधान केवळ एका पुस्तकाचे नाव नाही. भारताचे संविधान गतिशील असून सामाजिक संवेदनशीलतेला स्पर्श करणारा ऐतिहासिक दस्तावेज आहे. ज्या सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर मात करण्यासाठी संविधानाच्या संरचनेची निर्मिती झाली त्या संविधानाच्या नीतिमत्तेचे मूल्य स्थापत्य व स्वरूप आम्ही जोपर्यंत अंगीकृत करत नाही तोपर्यंत आम्हास भारतीय संविधान समजणार नाही, असे प्रतिपादन दत्ता मेघे वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

संविधान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित संविधान शाळेच्या नवव्या संवादात ‘संवैधानिक नैतिकता’ या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे व संविधान फाऊंडेशनचे प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून नमा खोब्रागडे यांनी कार्यक्रमास सुरुवात केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय संविधानात सुधारणा करण्याची मुभा असली तरी मूलभूत संरचनेत कोणत्याही स्थितीत बदल करता येत नाही. भारतीय संविधानाची प्रास्ताविका ही केवळ ग्रंथ सुरुवात किंवा तथ्य विवेचन नाही तर संविधानाच्या समग्र अस्तित्वाचे दृढ चिंतन आहे. संविधानाची नीतिमत्ता प्रास्ताविकेत गांभीर्यपूर्वक अंतर्भूत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चार मूल्यांत संविधानाची नीतिमत्ता निर्देशित आहे. संविधानाची उद्देशिका, सामाजिक न्याय, समानतेचा अधिकार, व्यक्ति स्वातंत्र्य, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्य विचारांशी कोणत्याही प्रकारची तडजोड करता येत नाही. राजकीय समानता ही सामाजिक व आर्थिक समानतेची हमी देत नाही. संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांची संविधानावर निष्ठा आणि बांधिलकी असली पाहिजे. संविधानामुळे आम्हाला ओळख मिळून जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे, असे मार्मिक विचार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचा समारोप करताना संविधान फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, संविधान आणि कायद्याचा सन्मान करत संविधान निष्ठेने लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणे ही संविधानिक नीतिमत्ता आहे. लोकांना जोडण्याचे काम शासन- प्रशासन व्यवस्था खऱ्या अर्थी करत आहे काय? याचे चिंतन करण्याची गरज आहे. संविधानाच्या जनजागृतीसाठी संविधानाच्या विविध पैलूंवर संविधान शाळेमध्ये चर्चा व संवाद घडवून आणण्याचा संविधान फाऊंडेशनचा हा एक प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमात संविधान हा विषय अनिवार्य करण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेले भाषण लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. कार्यालयात येणाऱ्या सामान्य माणसाला सन्मान दिल्यास ‘सुंदर माझे कार्यालय’ ही संकल्पना साकार होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा खोब्रागडे यांनी केले.
*******