नागपूर : नागपुरात एक बाप आपल्या वर्षभराच्या मुलाचा वैरी झाला आणि अत्यंत निर्घृणपणे खून केला. या दारुड्या बापाने आपल्याच पोटच्या मुलाला अंगणातील दगडावर फेकले, ज्यात डोक्याला मार लागल्याने त्या चिमुकल्याचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच एक वर्षाच्या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सत्यम भजन कौरती असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
तर भजन कौरती असे आरोपी बापाचे आहे. या निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भजन कौरती हा दारुच्या नशेत घरी आला. तेव्हा त्याने पुन्हा दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याच्या पत्नीने पैसे देण्यासाठी नकार दिला. तेव्हा भजन याने भांडण करायला सुरवात केली.
‘मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिला’
‘मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिला’, असं म्हणत भजन कौरती याने त्याच्या एक वर्षीय चिमुकल्या सत्यमला अंगणातील दगडावर फेकले. ज्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
क्षणात ही घटना घडल्याने सत्यमला वाचवण्याची संधी कुणालाही मिळाली नाही. आरोपी भजन कौरती याची पत्नी मथुराच्या तक्रारीवरुन खापा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.