खळबळजनक! वाघाच्या दोन बछड्यांचा विहिरीत बुडून मृत्यू ….

0
448

भंडारा – जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या गराडा/ बूज. (पहेला) गावाजवळील तलावालगतच्या टेकेपार उपसा सिंचनच्या सायफन विहिरीत आज पहाटे (दि. १२ मे रोजी ) वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कालच भंडारा जवळील बेला येथे एका वाघाचे पगमार्क दिसले, त्यामुळे या बछड्यांचे आणि त्या वाघाचे काही संबंध आहेत का या दिशेने तपास सुरु झाला आहे.

पोलीस आणि आर्मीची तयारी करण्यासाठी नित्याप्रमाणे पहाटे रनिंग करण्याकरिता गेलेल्या काही युवकांना वाघाचे दोन बछडे गराडा/ बूज. गावाच्या तलावाजवळ टेकेपार उपसा सिंचनच्या सायफन विहिरीत, बिट गट न. १७८ पीएफ येथे दोन बछडे मृतावस्थेत दिसून आले.ताबडतोब याची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी वाजुरकर यांच्यासह वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचले . त्यांनी विहिरीतून दोन्ही बछड्यांना बाहेर काढले. घटनास्थळी दोन्ही मृत बछड्यांच्या जवळच वाघिणीचे पगमार्क दिसून आल्याने या दोन्ही बछड्यांची आई जवळच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील ३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या सायफन विहिरीत ६ फुटापर्यंत पाणी भरले होते. याच मार्गाने जाणाऱ्या या बछड्यांचा या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या बछड्यांचे वय अंदाजे २ महिने असून त्या मादा आहेत. वरीष्ठ अधिकारी विभागीय वन संरक्षक एस.बी.भलावी, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान व शाहीद खान घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here