HomeBreaking Newsअंधाऱ्या जीवनात उजेड पेरणारा कवितासंग्रह : "मी उजेडाच्या दिशेने निघालो"

अंधाऱ्या जीवनात उजेड पेरणारा कवितासंग्रह : “मी उजेडाच्या दिशेने निघालो”

अंधाऱ्या जीवनात उजेड पेरणारा कवितासंग्रह :
“मी उजेडाच्या दिशेने निघालो”
——————————————————————-

मी उजेडाच्या दिशेने निघालो हा काव्यसंग्रह ज्येष्ठ कवी साहित्यिक ,समीक्षक ,आदर्श शिक्षक श्री अरुणभाऊ विघ्ने यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. याआधी त्यांचे “पक्षी” “वादळातील दिपस्तंभ” आणि “जागल” हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. मी उजेडाच्या दिशेने निघालो ह्या काव्यसंग्रहात ऐकून ८३ कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. श्री अरविंद शेलार यांचे अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ आणि डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी कवितेविषयी सुंदर असे भाष्य काव्यसंग्रहाला लाभलेले आहे.संजय ओरके व प्रशांत डोंगरदिवे यांची रेखाटने अतिशय बोलकी आहेत. हा काव्यसंग्रह मध्यमा प्रकाशन नागपूरच्या सौ. मंजीरीताई माधव लोखंडे यांनी प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहाला डॉ. भूषण रामटेके यांची अतिशय सुंदर आणि समर्पक अशी प्रस्तावना लाभलेली आहे.ते प्रस्तावनेतून म्हणतात की, अरुण विघ्ने उजेडाच्या दिशेने निघालेले कवी आहेत आणि त्यांची उजेडाच्या दिशेने प्रवास करणारी आहे. ह्याचे कारण म्हणजे बुद्ध, फुले, कबीर, शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भिमाई आणि सावित्रीबाई फुले ह्या प्रेरणास्थानातून आणि त्यांच्या विचारांच्या प्रभावातून त्यांची कविता प्रसवते.

आपल्या मनातलं व्यक्त करतांना कवी अरुण विघ्ने सर म्हणतात की,समाजातील काही घटक अनंत काळापासून उपेक्षितच होते आणि आहेत.ते विषमतेच्या व अस्पृश्यतेच्या अग्नीत जळत असतानाच बुद्ध, कबीर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे महत्वाचं कार्य केले.त्यांच्या रक्तविहिन वैचारिक क्रांतीन बहुजनांना मुक्त केलं ममतेन गोंजारल, कवटाळल, व्यथा वेदना समजून घेऊन बोट धरून काळोखाकडून प्रकाशाच्या दिशेन वाटचाल करण्याची संधी देऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय, करुणा, मैत्री, प्रेम, अहिंसा ह्या मूल्यांची ओळख देत बंदिस्त लेखणीतील गुलामिमुक्त करून बहुजनांच्या हाती दिली.आणि बघता बघता या लेखणीच्या भरवशावर शिक्षण क्षेत्रात या पाखरांनी गगनभरारी घेतली.आम्ही सारेच लिहू ,वाचू , शिकू लागलो. आज आमची पाऊल समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्यायाच्या दिशेने चालू लागतील.

मी उजेडाच्या दिशेने निघालो ह्या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता वाचनीय आहे.मनाला भावणारी स्पर्श करणारी , व्यक्तीला परिवर्तनाकडे घेऊन जाणारी काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. हा काव्यसंग्रह प्रत्येक नागरिकांनी, युवा तरुणांनी वाचायला हवे. या काव्यसंग्रहातून नक्कीच प्रत्येकाला जगण्याची नवी उमेदीची किरण सापडेल. परंतु मी उजेडाच्या दिशेने निघालो हा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो,यासाठी संघर्ष मेहनत घ्यावी लागते, सत्याच्या मार्गाने भ्रमण करावे लागते तरच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग गवसणार. यातील प्रत्येक कविता जीवनाला आधार देणारी, बळ देणारी परिवर्तनवादी वैचारिक असा मी उजेडाच्या दिशेने निघालो हा काव्यसंग्रह आहे. ह्या काव्यसांग्रहाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कवितेपासून झालेली आहे.

“असाच असतो बाप” या कवितेत बाप काय असतो, बापाची महती सांगताना कवी म्हणतो की,

लेकराची माय , अशक्ताचा सशक्त पाय
विस्तवावर जळणारी राळ असतो बाप
बाप अंधरातला प्रकाश असतो
मुलांच्या भवितव्याचा शिल्पकार असतो

अशाप्रकारे आपल्या कवितेतून बाप काय असते हे प्रखरपणे सांगितले आहे. बाप हा प्रत्येक मुलांच्या जीवनातील एक आधार असतो, छाया असतो, कधीही न विझनारी एक प्रकाशाची दिव्य ज्योत असते , विस्तावर जळणारी राळ असतो आणि मुलांच्या पुढील उज्वल भवितव्याचा शिल्पकार असतो बाप. “मी उजेडाच्या दिशेने निघालो” या कवितेत कवी,

तृष्णेच्या कोटी कोटी दगडांना ठेचाळून
रक्तबंबाळ होऊन टाकलेली माझी पावलं
आता तुझ्याच अष्टांग मार्ग चोखाळणार आहेत बुद्धा
बोधिवृक्षाखली विसवणार आहेत कायमची…

कवी म्हणतो की, हे करुणाकार बुद्धा मी ह्या विश्वाचा प्रवास करून करून फार थकलो आहे , तृष्नेच्या मोठ – मोठ्या दगडांना ठेच लागल्यामुळे माझे रक्तबंबाळ होऊन थकलेली पावल विसावणार आहेत ते पण कायमची.असे मी उजेडाच्या दिशेने निघालो या कवितेत कवी सांगत आहे. “एक धागा नात्याचा” कवितेत कवी म्हणतात की,

धागा एकतेचा ठेवतो असंख्य फुलांना एकत्र जोडून
एकमेकांशी नात्यासारखा घट्ट

ज्याप्रमाणे आपण असंख्य फुलांना एकत्र जोडत असतो, त्याचप्रमाणे माणसांच्या नात्यातील धागा फुलांणप्रमानेच एकमेकांशी घट्ट असायला पाहिजे.
“हा अंधार कसला” ह्या कवितेत,

हा अंधार कसला
झोपडीत माझ्या
उजेडाच झाड असता
अंगणात माझ्या

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अंधकार असतोच जर त्याला ह्या अंधारातून प्रकाशाकडे जायचे असल्यास, शांती प्रस्थापित करायचे असल्यास आपल्या घराच्या अंगणात एकतरी बोधिवृक्ष लावले पाहिजे.”एक कविता पडद्याआड” ह्या कवितेत कवी अरुण विघ्ने म्हणतात की,

कसलं प्रेम आणि कसल प्रपोज डे
मन सुन्न करणारी घटना
जेव्हा निषेधाची जागा घेते
तेव्हा कागद आणि पेनातली शाई ही गोठून जाते

आजच्या वास्तविक परिस्थितीत पाहता प्रेम हे केवळ वासना, शारीरिक सुखापुरते केले जात आहे. या प्रेमाला खरे प्रेम म्हणावे काय? असे कवी अरुण विघ्ने या कवितेतून सांगतात. प्रेमात असावा त्याग माणुसकी, जिव्हाळा , आपलेपणा असावा. “पोरी जरा ऐक माझ” या कवितेत,

तुझ गोरगोर तोंड पाहून
जळतील टारगट पोर
तुझ्या बॅगमध्ये ठेव खोटं
एक पिस्तूल नवं कोर

कवी म्हणतो की, पोरी जरा ऐक माझ, तू भिऊ नकोस, तुझ्या ह्या मावळपणा आता तू सोडून दे आणि हो जाहालवादाची पाईक, तुझ हे देखणं रुप , सौदर्य पाहून तुझ्यावर जळतील खूप पोर, तू नव्या युगाची सावित्री आहेस , तू कुंगफु , कराटे शिकून घे, आणि जमलच तर तुझ्याजवळ तू वाघनखही ठेव , एक पिस्तूल ठेव, तुला झाशीची राणी बनून स्वतःचे सुरक्षा कवच तुला स्वतःलाच बनावे लागेल. “ठसे कामगारांच्या पावलांचे” या कवितेत,

बोलतात पाय बघा हे कष्टकऱ्यांचे
सलतात दुःख काळजात वेदनांचे
भेगाळली पावले सत्य सांगते आहे
हेच जिणे आहे शोषित मानवांचे

बघा या फाटलेल्या पायांची कहाणी
जशी भेगाळावी पायाविना धरणी
आले कोरोनाचा गड सर करुनी
याला म्हणावे का निसर्गाची करणी?

कामगारांच्या कष्टाचे वर्णन ठसे कामगारांच्या पावलांचे या कवितेत कवी अरुण विघ्ने यांनी केले आहे. या कोरोनाच्या महामरित कामगार लोकांच्या वाट्यास फक्त दुःख आले. पाण्याला मुकले. रस्त्याने चालत असताना कामगारांच्या फाटलेल्या पावलांची ठसे उमटू लागली आहे , जगणे असह्य झाले आहे असे कवी सांगतो. “सत्कार” या कवितेत,

आता तरी देशाचे संविधान घ्या रे डोक्यात
बदलवा मस्तक, कुनीती पेरू नका मनात
जे राखतील निळ्या झेंड्याचे अस्तित्व
सत्कार करा त्यांचा पेन देऊन भरसभेत

देशात लोकशाही असूनही आज सगळीकडे विषमता दिसते आहे, लोक जातिधर्मात गुंतलेले दिसते आहे, संविधान बदलणारे, संविधान न मानून समाजात विषमतेचे बीज पेरणारे लोक दिसते आहे , म्हणून कवी आपल्या लेखणीद्वारे पेटून उठते आहे आणि म्हणतो , आता तरी संविधान डोक्यात घ्या रे, जो व्यक्ती निळ्या झेंड्याचे अस्तित्व राखतील, संविधानाचा सन्मान करतील अशा लोकांना भर सभेत पेन देऊन सत्कार करायला हवे असे कवी अरुण विघ्ने सत्कार या कवितेत म्हणतात. “पेटते हे रान आहे” या कवितेत ,

कापलेले वृक्ष आहे पेटते हे रान आहे
जंगलाच्या पाखरांची आज दाणादाण आहे

वात, पाणी प्रदूषणाने जीवनाचा घात आहे
माणसाने माणसांचा कोंडला तो प्राण आहे

वाचवावे यातूनी हे मी कसे त्या पामरांना
वाढलेल्या संकटाची मानवाला जान आहे

वृक्ष लावा एक आता, स्वास घेण्या मोकळा हा
नेक कामी साथ द्याया का कुणावर ताण आहे?

राबती जे लोक तेथे पोज त्याची येत नाही
लावती झाडे कुणी जे का तयांना मान आहे

आज लोकसंख्या वाढीमुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते आहे. याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे, प्रदूषण वाढल्याने जमिनीवर असणारे भूचर प्राणी , मानवांचे जगणे असह्य झालेले आहे, आणि या सर्वाला जबाबदर माणूसच आहे. या वाढत्या संकटांना आपल्यालाच थांबवायला हवे, मोकळा श्वास घ्यायचा असल्यास प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड करून त्याचे जतन ,संरक्षण केले पाहिजे. असा हा मोलाचा संदेश कवी अरुण विघ्ने यांनी ‘ पेटते हे रान ‘ या कवितेतून दिलेला आहे.

मी उजेडाच्या दिशेने निघालो हा कवितासंग्रह खरोखरच वाचनीय , प्रेरणादायी झालेले आहे. हा दर्जेदार काव्यसंग्रह सादर केल्याबद्दल माननीय अरुण विघ्ने सरांचे मनपूर्वक आभार!
मला हे दर्जेदार पुस्तक भेट स्वरूपात दिल्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद..!
पुढील अशाच प्रेरणादायी साहित्य निर्मितीसाठी कवी अरुण विघ्ने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो…!

विशाल शेंडे राजुरा✍️✍️
९३०९८२४३९६

कवी : मा. अरुण हरिभाऊ विघ्ने
कवितासंग्रह : मी उजेडाच्या दिशेने निघालो
प्रकाशन: मध्यमा प्रकाशन, नागपूर
पृष्ठे १५० मूल्य: २२०/- रु.

अरुण विघ्ने सरांचा
मो. व व्हॉट्सॲप न. ९८५०३२०३१६
———————————————————–

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!