कामगार आयुक्तांच्या पत्राला नगर प्रशासनाने दाखवली केराची टोपली..आश्वासन देऊन अद्याप सफाई कामगारांच्या मागण्यांची पूर्तता नाही..

472

नागेश इटेकर
तालुका प्रतिनिधी,गोंडपिपरी

गोंडपिपरी : येथील नगर पंचायत अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ ला प्रलंबित आणि थकित वेतनाचा मुद्दा घेऊन साखळी उपोषनाला बसले. त्यानंतर सुद्धा प्रशासन कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत बघ्याची भुमिका बजावत होते.प्रशासनाकडून कोणत्याच गोष्टीचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसताच उपोषण तीव्र करून दिनांक १२ फेब्रुवारी पासुन आमरण उपोषणाला सुरुवात केली, दरम्यान संधीत प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या पर्यंत गेली. संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला असता कामगारांच्या मागण्या रास्त असुन कायदेशीर रित्या पात्र आहेत. त्यांना त्यांचा मोबदला त्वरित देण्यात यावे त्याचप्रमाणे कामगारांवर अन्याय करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे सुद्धा लेखी आदेश सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी १६/२/२०२१ रोजी गोंडपिपरी नगर प्रशासनाला दिला. पश्चात कामगारांनी उपोषणाची सांगता केली.

शासनाच्या नियमावलित कुशल कामगारांना १६००० रुपये तर अर्ध कुशल कामगारांना १४००० रुपये ईतर देय भत्ते मिळुन महिन्याचे वेतन देण्याचे नमुद आहे.त्याच प्रमाणे महिन्यातून दोन रजा कामगाराच्या इच्छेनुसार घेता येईल असा नियम देखील शासनाने निर्गमित केला आहे.नगर पंचायत स्थापन झाल्यापासुन कामगारांना मात्र १५० ते १७० रुपये रोजी देऊन राबविल्या जात असून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे.काम करणारे दुसरेच आणि भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची उचल करणारे दुसरेच असा भोंगळ कारभार महिती च्या अधिकार दरम्यान समोर आला आहे.बरेच वर्षांपासून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा प्रकार जय भवानी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला.त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा लेखाजोखा शासन दरबारी रेटून धरला.आणि कामगारांच्या बाजूंनी मंजुर सुद्धा झाला.

मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला असून देखील नगर पंचायत कडून अद्याप कोणत्याच गोष्टीची पूर्तता करण्यात आली नाही.एकंदरीत प्रशासनाकडून कामगारांची फसवणुक होत असल्याने कामगारांत नाराजीचा सुर पसरला आहे. साखळी उपोषण ते आमरण उपोषण करून देखील कुंभकर्णी नगर प्रशासनाला जाग आली नाही, तत्वतच आयुक्तांच्या आदेशाचे देखील पालन न करता त्यांच्या लेखी पत्राला नगर प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे सुरज ठाकरे यांच्या कडून बोलले जात आहे.आता पर्यंत आम्ही प्रेमाची भुमिका घेत आलो, टोकाची भुमिका घ्यायला लावू नका. गोर गरीबांचे पैसे खाऊन त्यांच्यावर अन्याय करु नका,खाण्यासाठी तुम्हाला ईतर मार्ग आहेत आमच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका. येत्या काही दिवसांत सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर समोर जाऊन हिंसक आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा सज्जन इशारा सुरज ठाकरे यांनी नगर प्रशासनाला दिला आहे.