Home Breaking News सिरोंचा तालुक्यातील ५ गावांसाठी ‘पंप हाऊस’ मंजुरीची मागणी तीव्र…

सिरोंचा तालुक्यातील ५ गावांसाठी ‘पंप हाऊस’ मंजुरीची मागणी तीव्र…

126

सिरोंचा तालुक्यातील ५ गावांसाठी ‘पंप हाऊस’ मंजुरीची मागणी तीव्र

ब्युरो चीफ आदित्य चिप्पावार
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुका अंतर्गत येणाऱ्या गर्कापटा, पोचमपल्ली, गुट्टागुडम, कोटा व रंगय्यापल्ली या पाच गावांतील शेतकऱ्यांसाठी बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीस वेग आला आहे. या भागातील शेती पूर्णतः कोरडवाहू असून शेतकरी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सिंचनाची शाश्वत सोय नसल्यामुळे उत्पादनात घट होत असून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर *स्नेहादेवी फाउंडेशन, अहेरी* यांच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्राचे *आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम* यांना निवेदन देण्यात आले आहे. परिसरात सक्षम ‘पंप हाऊस’ उभारण्यात यावे, ज्यामुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठविण्यात आले असून, आवश्यक निधी उपलब्ध करून देत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी सविस्तर चर्चा करून तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी, “मी शासन स्तरावर निश्चित पाठपुरावा करून तुमचे काम मार्गी लावीन,” असे आश्वासन दिले.
या प्रकल्पामुळे आदिवासी बहुल व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Don`t copy text!