Home Breaking News मध्यरात्रीसह आज सकाळी नागपूर,भंडारा,गोंदियात पावसाची हजेरी; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’…

मध्यरात्रीसह आज सकाळी नागपूर,भंडारा,गोंदियात पावसाची हजेरी; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’…

159

मध्यरात्रीसह आज सकाळी नागपूर,भंडारा,गोंदियात पावसाची हजेरी; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’.

पुन्हा दोन दिवस अवकाळी पाऊसाची शक्यता

इंडिया दस्तक न्यूज वृत्त

नागपूर :- हवामान बदलाचे काही खरे नाही. काही वर्षांपासून पावसाळ्याचा नेमका ऋतू कोणता?
अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पाऊस केव्हा हजेरी लावेल व नुकसान करून सोडेल, याचा काही नेम नाही. अश्याच प्रकारे रविवारच्या मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली.
भंडाऱ्यात आज सोमवारी पहाटे ५ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. याचा फटका चना, तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांसह फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाल्याला बसला आहे. मात्र, उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. येथेही बागायतदार शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने आज, सोमवार २३ फेब्रुवारी व उद्या, मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तविला असून विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर तर मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Don`t copy text!