Home Breaking News मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबटाचा प्रतिहल्ला; दोन युवक जखमी…

मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबटाचा प्रतिहल्ला; दोन युवक जखमी…

131

मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबटाचा प्रतिहल्ला; दोन युवक जखमी
धमदीटोला शेतशिवारात भीतीचे वातावरण

जिल्हा संपादक नितेश खडसे इंडिया दस्तक न्यूज गडचिरोली.

कुरखेडा पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला शेतशिवारात रविवारी सकाळी बिबटाच्या प्रतिहल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मक्का पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याला लाठ्या-काठ्या घेऊन हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अचानक प्रतिहल्ला केल्याने दोन युवक जखमी झाले.
मागील तीन-चार दिवसांपासून धमदीटोला परिसरात बिबटाचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने धरमदास उईके व राधेश्याम साहळा यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला होता.
रविवारी सकाळी पटाचा दाणी परिसरातील सचिन झोळे यांच्या शेताजवळ बिबट दिसताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या घेऊन तेथे धावले. यावेळी मका पिकात लपून बसलेल्या बिबटाला हुसकावण्याचा प्रयत्न सुरू असताना चवताळलेल्या बिबटाने अचानक हल्ला चढवला. यात चेतन ब्रम्हनायक व आनंदराव कुमरे हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वन विभागाची टीम काल सायंकाळपासूनच परिसरात तळ ठोकून आहे. ग्रामस्थांनी बिबटाच्या जवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या बिबट अजूनही एका मका शेतात लपून असल्याची माहिती आहे. रब्बी हंगामामुळे शेतात शेतकरी व मजुरांची वर्दळ असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
वन विभागाकडून ड्रोन कॅमेराद्वारे बिबटाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सायंकाळी शेतकरी घरी परतल्यानंतर योग्य नियोजन करून बिबटाला जंगलाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक (IFS) जोजीन जार्ज, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत कोपूलवाड, क्षेत्र सहाय्यक संजय कंकलवार व बाबूराव तुळावी यांनी दिली.

Don`t copy text!