एटापल्लीत पत्रकारांच्या संघर्षाला मोठे यश;प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे.
१७ फेब्रुवारीच्या बैठकीत मिळणार अंतिम प्रशासकीय मान्यता; रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली :
तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्नी पत्रकारांनी पुकारलेल्या आंदोलनासमोर अखेर प्रशासन झुकले आहे. गेल्या सहा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शनिवारी १४ फेब्रुवारी हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. या यशामुळे एटापल्ली तालुक्यातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे.
एटापल्ली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी पत्रकार संघटनेने ९ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने १३ फेब्रुवारीपासून पत्रकारांनी ‘आमरण उपोषणा’चे हत्यार उपसले. आंदोलनाची तीव्रता आणि वाढता जनपाठिंबा पाहून प्रशासकीय यंत्रणा हलली.
शनिवारी उपविभागीय अधिकारी अमर राऊत, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, एसडीपीओ चैतन्य कदम, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
एटापल्ली–देवदा–गडचिरोली आणि एटापल्ली–हेडरी–गट्टा या मार्गांच्या कामांना प्राधान्य.
जिल्हा खनिज निधी योजनेतून कामांना मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय.
१७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार.
आंदोलनादरम्यान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले व लवकरच कामाला सुरुवात होईल, असा शब्द दिला. तसेच माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकाडलावार, सैनु गोटा,आणि प्रज्वल नागुलवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.
गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जैयस्वाल यांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
प्रशासनाने लेखी हमी दिल्यानंतर,लिंबू पाणी घेऊन पत्रकारांनी उपोषण सोडले.
मात्र,हा विजय तात्पुरता नसून प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करावे,असा इशारा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार यांनी दिला आहे.
या ऐतिहासिक आंदोलनात पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार,गजानन खापने,तनुज बल्लेवार,प्रशांत मंडल,अमित कत्तीवार,तेजस गुज्जलवार,शैलेश आकुलवार,आदित्य चिप्पावार,शशांक नामेवार,महेंद्र सुल्वावार,राकेश तेलकुंटलवार,विनोद चौव्हान, मुकेश कावळे,जनार्धन नल्लावार,विश्वनाथ जांभुळकर आणि आनंद बिश्वास यांचा सक्रिय सहभाग होता.
”प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचे आम्ही स्वागत करतो. मात्र,१७ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही,तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
रविंद्र रामगुंडेवार (अध्यक्ष, पत्रकार संघटना,एटापल्ली)







