Home Breaking News गडचांदूर पोलिसांच्या नाकाखालीच तस्करांची दादागिरी; बबन आत्राम प्रकरणाने अंबुजा सीमेंट ठेकेदारी कामगारा...

गडचांदूर पोलिसांच्या नाकाखालीच तस्करांची दादागिरी; बबन आत्राम प्रकरणाने अंबुजा सीमेंट ठेकेदारी कामगारा मध्ये तीव्र संताप…

536

गडचांदूर पोलिसांच्या नाकाखालीच तस्करांची दादागिरी; बबन आत्राम प्रकरणाने अंबुजा सीमेंट ठेकेदारी कामगारा मध्ये तीव्र संताप
‘लक्ष्मी दर्शना’मुळे खाकी डागाळली? बिट जमादार आणि त्यांचे सहायक सहकर्मी यांच्या आशीर्वादाने दारू माफियांचे मनोबल उंचावले.

मुख्य संपादक मुन्ना तावाडे

गडचांदूर/कोरपना (प्रतिनिधी):
उप्परवाही गावात अवैध दारू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, आता हे माफिया थेट पोलिसांच्या दारात येऊन धमक्या देण्यापर्यंत मग्रूर झाले आहेत. ८ फेब्रुवारी रोजी बबन नारायण आत्राम या आदिवासी तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली असतानाच, गडचांदूर पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत तक्रारदाराला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे पोलिसांचा धाक संपला असून तस्करांचे राज्य सुरू झाले आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

पोलीस स्टेशनच्या उंबरठ्यावरच दहशत!

८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:१० च्या सुमारास बबन आत्राम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी बबन गडचांदूर पोलीस स्टेशनला पोहोचले. तक्रार नोंदवून जसे ते बाहेर पडले, तसे पोलीस स्टेशनच्या मुख्य दारावर प्रमोद कुंटलवार नामक तरुणाने त्यांना अडवले. “तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा मारू,” अशी उघड धमकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली देण्यात आली. धक्कादायक म्हणजे, एका पोलीस कर्मचाऱ्याने या घटनेची नोंद घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत.

बिट जमादारांचे ‘अर्थपूर्ण’ मौन आणि तस्करांचे साटेलोटे?

उप्परवाही परिसरात अवैद्य दारू विक्री फोफावण्यामागे बिट जमादार आणि त्यांचे सहाय्यक सहकर्मी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. गावातील दारूबंदी समर्थक महिलांनी ‘श्रमिक मंथन’शी बोलताना गंभीर आरोप केले आहेत:
* लक्ष्मी दर्शन: तस्करांकडून होणाऱ्या नियमित ‘वसूली’मुळे पोलीस अधिकारी तस्करांचे ‘हितेशी’ बनले आहेत.

धमकी देणाऱ्या तरुणाचे नाते सबंधातील काही मंडळी अवैध दारूचा मोठा व्यापार करतात, त्यांना या अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे बोलले जात आहे.

आदिवासी समाजात संताप;

मोठ्या जनआंदोलनाची चिन्हे
अवैध दारू तस्करीतून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर उप्परवाही ग्रामीण क्षेत्रालगत काही नव नवीन भाई डोके वर काढ़त आहेत . पोलिसांच्या नाकाखाली घडलेला हा प्रकार म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे लक्षण आहे.

> “भर पोलीस स्टेशनसमोर धमकी देण्यापर्यंत तस्करांची हिंमत वाढतेच कशी? जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या हलगर्जी कर्मचाऱ्यांवर आणि गुंडांवर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” — स्थानिक नागरिक व आदिवासी संघटना.

वरिष्ठ दखल घेणार का?
अवैद्य व्यवसायावर आळा घालण्याऐवजी तस्करांच्या तालावर नाचणारे अधिकारी गडचांदूर पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करत आहेत. बबन आत्राम प्रकरण आता चिघळले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची सखोल चौकशी करून ‘हप्तेखोर’ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!