Home Breaking News रस्ते दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर;एटापल्ली पत्रकार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरू…

रस्ते दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर;एटापल्ली पत्रकार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरू…

119

रस्ते दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर;एटापल्ली पत्रकार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरू…

विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

​एटापल्ली : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ एटापल्ली पत्रकार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज, ९ फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार पत्रकारांनी व्यक्त केला आहे.

जीवघेण्या प्रवासाने नागरिक त्रस्त
​एटापल्ली तालुक्यातून जिल्हा मुख्यालयाला जोडणारा एटापल्ली–देवदा–गडचिरोली मार्ग, तसेच एटापल्ली–जारावंडी आणि एटापल्ली–हेडरी–गट्टा हे तीनही मुख्य रस्ते सध्या मृत्यूचे सापळे बनले आहेत.
अपघातांचे प्रमाण वाढले: खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
​रुग्णांचे हाल: विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून नेताना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाटेतच रुग्णांची प्रकृती अधिक बिघडत असल्याच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत.

दोन महिन्यांचा अल्टिमेटम संपला
​या प्रश्नी व्हाईस ऑफ मीडिया आणि एटापल्ली प्रेस असोसिएशनने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन दोन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने अखेर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला रस्त्यावर उतरावे लागले आहे.

सर्वपक्षीय आणि सामाजिक पाठिंबा
​पत्रकारांच्या या लढ्याला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अनेक मान्यवरांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. यामध्ये प्रामुख्याने:
​रेखाताई मोहूर्ले (नगराध्यक्ष, एटापल्ली), नगरसेवक जितेंद्र टिकले, राघवेंद्र सुल्वावार, राहुल कुळमेथे, नामदेव हिचामी.
​राजगोपालजी सुल्वावार (शिवसेना जिल्हा संघटक), सचिन मोतकुरवार (भाकपा जिल्हा महासचिव), संभा हिचामी (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष).
​विजय खरवडे (भारतीय जनसंसद), महेश मोहूर्ले (माळी समाज अध्यक्ष), सुशील रच्चावार (पदमशाली समाज अध्यक्ष) महेश पुल्लूरवार (अध्यक्ष व्यापारी संघटना एटापल्ली) यांसह अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

​प्रशासनाची भेट, पण तोडगा नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ए.एस. चेळकर यांनीही भेट देऊन “रस्त्याचे काम प्रस्तावित आहे” असे आश्वासन दिले. मात्र, “केवळ कागदी प्रस्तावांवर आता आमचा विश्वास नाही, प्रत्यक्ष मशीनरी रस्त्यावर उतरून काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा इशारा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र रामगुंडेवार यांनी दिला आहे.

​उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांनी उपोषण स्थळाची पाहणी करून शांततेचे आवाहन केले.

आंदोलनात सहभागी पत्रकार:
​या आंदोलनात रवींद्र रामगुंडेवार (अध्यक्ष), गजानन खापणे, जनार्धन नल्लावार, मणीकंठ गादेवार, महेंद्र सुल्वावार, तनुज बल्लेवार, प्रशांत मंडल, विनोद चौव्हान, अमित कत्तीवार, तेजस गुज्जलवार, शैलेश आकुलवार,मुकेश कावळे आणि विश्वनाथ जांभूळकर यांच्यासह अनेक पत्रकार सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

Don`t copy text!