Home Breaking News संत जगनाडे महाराजांच्या लेखणीतून समाजाला प्रेरणादायी विचारांचा वारसा लाभला – विधिमंडळ पक्षनेते...

संत जगनाडे महाराजांच्या लेखणीतून समाजाला प्रेरणादायी विचारांचा वारसा लाभला – विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार…

100

संत जगनाडे महाराजांच्या लेखणीतून समाजाला प्रेरणादायी विचारांचा वारसा लाभला – विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

नवरगाव येथे संत जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती साजरी

संपादक प्रशांत बिट्टूरवार

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांनी समता, बंधुता आणि परिश्रमाचे महत्त्व समाजाला शिकवले. त्यांनी आयुष्यभर समाजातील दुबळ्या घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि लोकांना सत्य, प्रामाणिकपणा व कष्टाचे मूल्य कळले. आजच्या पिढीने संतांच्या शिकवणीचा आदर्श ठेवून समाजहितासाठी काम करणे हीच काळाची गरज असून संत जगनाडे महाराज यांच्या लेखणीतूनच समाजाला प्रेरणादायी विचारांचा वारसा लाभला असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे जीवनदायी तैलिक समाज मंडळाच्या वतीने आयोजित संत जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंती निमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून नवरगाव येथील दैनिक समाज मंडळाचे सल्लागार सुभाष बोडणे, प्रमुख अतिथी म्हणून जानकीराम कामडी, सरपंच राहुल बोडणे प्रभाकर कामडी, प्राध्यापक सुधाकर भुते, तेली समाज अध्यक्ष दिवाकर कामडी, महिला अध्यक्ष कविता आंबोरकर सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, माजी प.स.सभापती वीरेंद्र जयस्वाल त्रिलोक कामडी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार म्हणाले की, “संतांचा वारसा हा समाजाला एकत्र ठेवणारा आहे. जात-पात, भेदभाव दूर करून समानतेचा संदेश देणाऱ्या संतांच्या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे. शासन आणि समाजाने एकत्र येऊन संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन केले पाहिजे.” प्रत्येक समाजाने आपसातील वैचारिक मध्ये दूर सारून समाज एकतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. सोबतच समाजाची प्रगती साधायची असेल तर राजकारणात प्रतिनिधित्व करणे आणि सर्व समाजाने त्या प्रतिनिधीच्या पाठीशी खंबीर उभे राहणे ही देखील आजच्या काळाची गरज आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी लोकप्रतिनिधी या नात्याने विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी तेली समाज सभागृहासाठी ५० लक्ष रुपये, तसेच सभागृह बांधकाम परिसराला संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी १५ लक्ष रुपये असे एकूण ६५ लाख रुपये विकास निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यातआला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा कामडी, प्रास्ताविक दिवाकर कामडी तर आभार सरपंच राहुल बोडणे यांनी मानले. आयोजित कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने तेली समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते.

Don`t copy text!