दिलेला शब्द केला पूर्ण : बोलपल्ली येथे एअरटेल व व्हीआयचे दोन मोबाईल टॉवर मंजूर

प्रतिनिधी गौरव बुरांडे
बोलपल्ली (मुलचेरा तालुका) :
मुलचेरा तालुक्यातील दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या बोलपल्ली गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या होती. अपुऱ्या सिग्नलमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांचे कृषीविषयक व्यवहार, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत होती. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांच्याकडे मोबाईल टॉवर उभारणीची ठाम मागणी केली होती.
ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन प्रशांत शाहा यांनी संबंधित दूरसंचार कंपन्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत बोलपल्ली येथे एअरटेल व व्हीआय (VI) या दोन नामांकित कंपन्यांचे दोन स्वतंत्र मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.
यासंदर्भात माहिती देताना शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी सांगितले की, मोबाईल नेटवर्क ही आजच्या काळातील अत्यावश्यक गरज असून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक यापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिवसेनेच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अवघ्या एका महिन्यात मोबाईल टॉवर उभारणीचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर बोलपल्लीसह आसपासच्या गावांनाही चांगल्या दर्जाची नेटवर्क सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे बोलपल्ली गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे होणाऱ्या अडचणी आता कायमस्वरूपी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय योजना, ऑनलाइन सेवा, आपत्कालीन आरोग्य सेवा आणि व्यापारी व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.
ग्रामस्थांनी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याबद्दल शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांचे आभार मानले असून, त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.







