जिल्हा प्रतिनिधी गौरव मोहबे
घुग्गुस नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेत वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र आता उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातच दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे.
नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते राजू रेड्डी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करण्याचे निर्देश देत पक्षीय व्हिप जारी केला आहे.
सध्या काँग्रेस पक्षाच्या गटात १४ नगरसेवक असून, अलीकडेच काँग्रेसमध्ये सहभागी झालेले दोन अपक्ष नगरसेवकांनाही हा व्हिप लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
घुग्गुस शहरातील मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून बहुमत दिले असून, त्या जनमताचा अवमान करू नये, असे आवाहन राजू रेड्डी यांनी केले आहे. पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच नगरसेवक पद धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पक्षशिस्त राखून अधिकृत उमेदवाराच्या बाजूने मतदान करावे, असे स्पष्ट निर्देश काँग्रेस गटनेत्यांनी दिले आहेत.







