Home Breaking News उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; प्रशासन गाढ झोपेत!…

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; प्रशासन गाढ झोपेत!…

209

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; जिवतीत संतापाचा उद्रेक

प्रतिनिधी बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात शासनानी अतिवृष्ठीची आर्थिक मदत ८५०० रुपये तत्काळ जमा करण्यात यावे या मुख्य मागणीसह
जिवती ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करावे, भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, कोदेपूर, गुडशेला आणि जिवती येथील तलावाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करावे, पेदाआसापूर आणि धोंडामांडवा येथे सिंचन तलाव मंजूर करावेत, तसेच माराईपाटण येथील देवस्थानाचे सौंदर्यीकरण करावे या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी ४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणून तीव्र नाराजी शेतकरी बांधवांत व्यक्त होत आहे.
उपोषणाच्या ठिकाणी शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने जमत असून, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तालुका बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उपोषणकर्त्याच्या प्रकृतीची गंभीर अवस्था पाहता शासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

Don`t copy text!