गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अवैध दारूसह चारचाकी वाहन जप्त – एकूण ८.६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली, दि. ७ नोव्हेंबर :
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आलापल्ली येथे सापळा रचून चारचाकी वाहनातून देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींना पकडले. या कारवाईत तब्बल ₹८,६९,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२० ईजे ५२७२ मधून दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्वल यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली येथील सावरकर चौकात सापळा रचण्यात आला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, चालकाचे नाव पंकज अशोक शर्मा (रा. चंद्रपूर) असे समोर आले. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळली.
दारूचा तपशील पुढीलप्रमाणे —
देशी संत्रा दारू ३१ बॉक्स (किंमत ₹२.४८ लाख), रॉयल स्टॅग व्हिस्की ₹१.४७ लाख, हेवर्ड बिअर ₹१.०८ लाख, ऑफिसर चॉईस व्हिस्की ₹४२ हजार, ट्यूबर्ग बिअर ₹२१,६००, चारचाकी वाहन ₹३ लाख, मोबाईल फोन ₹१० हजार. एकूण किंमत ₹८,६९,४०० रुपये.
चौकशीअंती आरोपीने सांगितले की, त्याने व त्याचा साथीदार सुलतान शेख (रा. चंद्रपूर) यांनी किशोर डांगरे व पप्पी झोरे (रा. आलापल्ली) यांच्या सांगण्यावरून ही दारू आणली. या प्रकरणी पोस्टे अहेरी येथे कलम ६५(अ), ९८(२), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पंकज शर्मा याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्वल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, चापोशि दिपक लोणारे यांनी पार पाडली.







