प्रतिनिधी गौरव मोहबे
गोंडपिपरी: प्रेमाचे नाटक करून एका अल्पवयीन शाळकरी तरुणीवर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युगल राकेश मुंजनकर (वय १८) या युवकाविरुद्ध ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिंपरी तालुक्यातील ही फिर्यादी अल्पवयीन तरुणी सन २०२४ मध्ये गोंडपिपरी येथील जनता विद्यालयात इयत्ता १० वीत शिक्षण घेत होती. शाळेला ये-जा करण्यासाठी ती बसचा वापर करत असे. आरोपी युगल मुंजनकर हा देखील त्याच बसने सकमूर येथून शिक्षणासाठी येत असल्याने त्यांची ओळख झाली. आरोपीने तिच्याशी जवळीक साधून प्रेमाची विचारणा केली. सुरुवातीला नकार असतानाही आरोपीने वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर तिने ‘होकार’ दिला आणि दोघांचे बोलणे-चालणे सुरू झाले.
जानेवारी २०२५ मध्ये आरोपी युगलने तरुणीला ‘काहीतरी बोलायचे आहे’ असे सांगून मोटारसायकलने गोंडपिपरी येथील फलके यांच्या हॉटेलवर घेऊन गेला. तिथे रुममध्ये नेत आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये काढून ठेवले.
जानेवारी २०२५ पासून ते १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत आरोपीने काढलेले हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अल्पवयीन तरुणीवर प्रत्येक महिन्यात वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीवर गुन्हा दाखल
अखेर पीडित तरुणीने हा सगळा प्रकार पालकांना सांगितला आणि त्यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मंगेश कराडे, वर्षा नैताम यांनी घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन, आरोपी युगल मुंजनकर याच्यावर m२१४/२०२५ कलम (६४)२(i),६४(२)(m),(६५)१,३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी पोलीस करत आहेत.







