जेव्हा शरीर फक्त नवऱ्याजवळ आणि मन मात्र कुठेतरी घिरट्या घालत असतं…

987

नुसतं नावानेच अंगावर शहारे आणि रोमांच. रेशीमगाठ म्हणे स्वर्गात बांधली जाते.आम्ही फक्त निमित्तमात्र वा रे! वा!, म्हणजे सगळा भार देवावर आणि नशिबावर. आपण नातं जपायच्या जवाबदारीतून मुक्त. आपल्या जबाबदारीच्या कर्तव्यातून सुटका आणि मुक्तता करून घेता ना पण हीच मुक्तता आज आयुष्याला ठेचा देतं आणि जगणं रक्तबंबाळ करीत असते.

कुटुंबरुपी संसाराची नौका पैलतीरावर न्यायची आणि समाधानाने डोळे बंद करायचे. किती छान वाटत ऐकायला. पण संसार म्हणजे काही तीन तासाचा सिनेमा नव्हे की जिथे आधीच सर्व कथानक ठरला आहे. कधी कोणतं वादळ कोणत्या रूपात येणार आणि नवरा बायकोच्या नात्यालाच आव्हान देईल हे सांगता येत नाही. अशावेळी नात्याची वीण घट्ट असावी. काही प्रसंग धगधगत्या आगीसारखे सत्व पाहण्यासाठी येतात की काय जणू. असले प्रसंग म्हणजे जळते निखारेच. आयुष्य होरपळून काढतात. छाताडावर आसूड ओढले जातात. जगणं असह्य आणि नकोसं होतं. संवेदना बधीर होतात. डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार. मग सुरेश भट यांच्या काव्यपंक्ती मनात घिरट्या घालतात.
“इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..”

खरचं काही घटना ह्या हृदयात कायमस्वरूपी कोरल्या जातात असं म्हणतात. नवरा बायकोच्या नात्याची गाठ म्हणे सात जन्मापर्यंत बांधलेली असते. पण सध्या या एकाच जन्माने पळता भुई थोडी केली आहे. पत्नी संसाराचा गाडा हाकत कधी कधी जबाबदारीच्या ओझ्याने त्रासून जाते.चिड चिड होते. लक्ष वेधण्यासाठी आदळ आपट ही केली जाते. मनात नुसती घालमेल आणि खद खद. दिव्याखाली ही अंधार असतो. तो अंधार दूर करण्याची दिव्यदृष्टी नवरा बायको ह्या दोघांकडे असावी लागते.पण लक्षात कोण घेतो.

स्त्रीला ही मन भावना असते आणि त्या जर सारख्याच पायदळी तुडवला असतील, तर ही नवऱ्यासाठी वादळ येण्यापूर्वी धोक्याची घंटा समजावी. काय हवं असतं हो तिला. देखणा नवरा, पैसा, दागिने तशी यादी खूप मोठी होईल. खरं तर यातलं काहीही नको असतं.फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेम करून घेणार निखळ मन, समजून घेणारं मन, किमान मानाने जगता येईल असं घरपण, हक्काने मान टेकवता येईल असा विश्वासू खांदा आणि ढसा ढसा रडून कधीही मन मोकळे करता येईल असा विश्वासू सारथी.

मला जगाने नाकारले तरी माझा सारथी माझ्या सोबत आहे. हा विश्वास आणि उभ्या आयुष्यात नवरा बायको या दोघांनाही हा विश्वास एकमेका प्रती नाही निर्माण करता आला.तर त्यांच्या सारखं संसारातले दुसरं अपयश कोणत नाही. खरं तर जगात तरी संवादाने सुटु शकत नाही अशी एकही समस्या अस्तिवात नाही.पण तो संवाद एका हृदयातून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचणारा असावा.तिथे मी पणाचा लवलेश ही नसावा.कारण मला कुणीतरी समजून घेतय. माझं कुणीतरी ऐकुन घेतय ही भावनाच स्त्रीला जगण्यासाठी बारा हत्तीच बळ देतं.नुसत्या ठेल्यावरची पाणी पुरी खाऊ घाला बायकोला आनंदाने अख्या जगाला ओरडून सांगेल.पण जेव्हा हा नवरोबा अश्या छोट्या छोट्या क्षणाचा आनंद हिरावून घेतो.तेव्हा नुसती धुसफूस होत असते मनात…

कळतच नाही त्याला त्याच्या हातातून काय निसटून चाललय. मुलं जन्माला घातली आणि घरखर्च भागवला म्हणजे झाली कर्त्यव्य पूर्ती? असं नसतं कधी. खरं तर तेव्हाच तिच्या काळजात विस्तवाची ठिणगी पडायला सुरुवात होते. त्याचं वनव्यात रूपांतर होण्यापूर्वीच डोळस व्हावं. कारण शरीरावरचे कसले ही खोल घाव भरून निघतात. पण काळजात होणारी जखम भरून काढणारी औषध अजुन तरी वैद्यकीय शास्त्रात नाही. तिला ही मन आहे. भावना आहेत आणि शरीरही. दोन शरीर एकत्र येण्याआधी दोन मन एकरूप व्हावी लागतात. हे जपावे नाहीतर कालांतराने एक वेळ अशी येते की.शरीर फक्त नवऱ्यापाशी आणि मग मन मात्र कुठेतरी घिरट्या घालत असतं आभाळात आणि अशावेळी आभाळच फाटलं तर ?

श्याम म्हशाखेत्री
जिल्हा संपादक, चंद्रपूर
मो.न. 8788484633