“आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय”
“आज रात बारह बजे जब सारी दुनिया सो रही होगी भारत जीवन और स्वतंत्रता की नई सुबह के साथ उठेगा।”
ज्या पहाटेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत
आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला
विकासाच्या बाता झाल्यात
टाचणी न बनणाऱ्या देशात
मोठाल्या जहाजांची निर्मिती होऊ लागली
पण विकासाचे हे परिस मात्र आम्हाला कधी
स्पर्शीलेच नाही
ज्या पहाटेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत
आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय
संविधानाची अंमलबजावणी
आणि प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची ग्वाही
विज्ञानाची गरूडझेप
आणि पहिल्याच प्रयत्नात भारताची मंगळस्वारी
पाठविले यान ज्या चंद्रावर पाण्याच्या शोधात
परंतु आमच्या वस्तीतील नळाला मात्र पाणीच नाही
ज्या पहाटेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत
आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय
शाश्वत विकास आणि मानवी हक्कांचे वारे
आमच्या वस्तींमधून कधी वाहलेच नाही
प्रत्येकाने वापर केला आमचा निव्वळ ‘वोटींग बॅंक’ म्हणून
रस्त्याच्या कडेला फूटपाथवर निवारे आमचे
आवास योजनेचा आम्हास पत्ताच लागला नाही
ज्या पहाटेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत
आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय
खर सांगाव तर
आजादीचा अमृतमहोत्सव असो किंवा ईद, दिवाळी…
आमच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच!
तिच भाकरीच्या तुकड्यासाठी पायपीट
नशीबाने एकवेळची भाकर मिळाली तर उद्याच कसं?
सतत मनाला लागलेली ही काळजी
येणार काय परत कोणी गांधी,आंबेडकर,नेहरू,पटेल,बोस?
या अठराविश्व दारिद्रयाच्या पारतंत्र्यातून
आमची कायमची सुटका करण्यासाठी
खरचं कधीतरी विकासाची सुवर्णपहाट
होणार काय आमच्या आयुष्यात?
की नेहरूजींचे हे शब्द निव्वळ एक मृगजळच राहील आमच्यासाठी?
ज्या पहाटेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत
आम्ही आजही त्या नवीन पहाटेची वाट बघतोय
© निकिता अनु शालिकराम बोंदरे.
Instagram:- @nikita_via_pen
Facebook:- @nikita_via_pen






