धो- धो पावसातही काँग्रेसच्या ” गौरव यात्रेला ‘ दमदार सुरूवात…आझादी अमृत महोत्सव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

375

देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या थोर नेत्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदान व देश निष्ठेने मिळालेले स्वातंत्र्य व जनसामान्यांना मिळालेले संविधानिक मूलभूत अधिकार यामुळे देशाने झपाट्याने प्रगती केली. मात्र देशभक्तीचे सोंग पांघरून जनसामान्यांना महागाईच्या खाईत लोटनाऱ्यांनी तसेच खाजगीकरणाच्या नावावर व्यापाऱ्यांच्या संपत्तीत भर घालणाऱ्या भाजप सरकारने संपूर्ण देशाचे वाटोळे केले आहे.

पूर्वी गोऱ्या तर आता काळ्या इंग्रजांविरुद्ध देशाव्यापी लढा ऊभारून देशात माजवलेली अराजकता संपविणे काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथे आयोजित आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित गौरव पदयात्रा प्रारंभ प्रसंगी बोलत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा काळ लोटला. या ऐतिहासिक क्षणाला अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात ९ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव गौरव पदयात्रेचे आयोजन करण्याचे ठरविले. आज चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सदर गौरव पदयात्रेस आयोजन गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी या गावात प्रारंभ केला. याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार, राजुरा विधानसभा क्षेत्र आ. सुभाष धोटे, वरोरा विधानसभा क्षेत्र आ. प्रतिभा धानोरकर यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, महीला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, जिल्हा बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, व जिल्हा काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व बहूसख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.

याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, जगाच्या पाठीवर सुजलाम सुफलाम व धर्मनिरपेक्ष तथा प्रगत देशांपैकी एक अशा विचार सारणीचा देश म्हणून भारत देशाची ओळख निर्माण झाली. मात्र गेल्या दशकापासून देशात जातीपातीच्या राजकारणातून अराजकता माजवण्याचे काम भाजप सरकारने केले. आज देशातील गोरगरीब जनता महागाईच्या आगीत होरपळून जात असताना कधी शेतकरी विरोधी कायदे तर कधी शासकीय यंत्रणेच्या गैरवापरातून सत्तांतरणाची कुरघोडी अशा नाना प्रकारच्या अनैसर्गिक खेळी हुकुमशाही भाजप सरकारकडून होत आहे. त्यामुळे देशाच्या सार्वभौम संविधानाला बाजूला सारून केवळ हुकूमशाही राजवट निर्माण करण्यात येतो भाजपने आखलेला डाव हाणून पाडणे काळाची गरज आहे. काँग्रेसच्या या आजादी अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या गौरव पदयात्रेतून ग्राम खेड्यातील घरोघरी काँग्रेस विचारधारा पोहोचविण्यासाठी सर्व काँग्रेस नेते पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून देशात पुन्हा लोकशाही शासन आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. आयोजित गौरव पद यात्रेचे आयोजन गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथून सकाळी प्रारंभ झाला तर सदर यात्रा पहिल्या दिवशी गौरव यात्रेचा ताफा आक्सापूर मार्गे, चिंतलधाबा, पोंभुर्णा, देवाडा, सीनाळा, भेजगाव, मुल पर्यंत पोहोचली. मुल येथील गांधी चौकात आयोजित सभेस हजारो संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.