दिवसा चायनीजची गाड़ी आणि रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला चिंचवड पोलिसांनी केली अटक…

423

दिलीप सोनकांबळे

चिंचवड (पुणे) : चिंचवड मधे चोरीच्या पैशातून सावकारी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. लखन अशोक जेटीथोर असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले, सुरेश नारायण जाधव यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घरफोड्या करून त्याने लाखो रुपयांची माया जमवली होती. त्या चोरीच्या पैशांतून त्याने चक्क सावकारी व्यवसाय सुरू केला होता. या अट्टल चोरट्याचा माग काढून चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी लखन जेटीथोर हा चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता. दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.
या कारवाईमुळे चोरी केलेले 78 तोळे सोने, 10 टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्युनर असा एकूण 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.