धक्कादायक! अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच केला लैंगिक अत्याचार…

978

नांदेड : अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुदखेडच्या अनाथ आश्रम चालकानेच हा अत्याचार केल्याची माहिती आहे. या आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल असून तो सध्या फरार आहे. पोलीस आरोपी शिवाजी गुटठे याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमधील मुदखेड येथे एक अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात अनेक मुली आहेत. आश्रमाचा संस्थाचालक शिवाजी गुटठे याने तक्रारदार मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसा आरोप तक्रारदार मुलीने केला आहे.

तक्रारदार मुलीने आरोपीच्या अत्याचारांना कंटाळून अखेर आपल्या एका मैत्रीणीसोबत अनाथाश्रमातून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने मुदखेडहून रेल्वेप्रवास करत थेट किनवट शहर गाठले. यानंतर अनाथाश्रमामधून मुली गायब असल्यामुळे खळबळ उडाली.

पोलिसांना संशय आणि प्रकार समोर आला : मुली अनाथाश्रमातून गायब झाल्यानंतर त्या किनवट येथे भटकत होत्या. या दोन मुलींच्या हावभावावरुन त्या अडचणीत असल्याचे किनवटच्या पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी या मुलींची चौकशी केल्यानंतर मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. अनाथाश्रमाचा चालकच यातील एका मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे या मुलींनी सांगितले.

आरोपी फरार : दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या मुलींची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी शिवाजी गुटठे याला शोधण्याची मोहीमही सुरु केली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.