भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार; ५ जखमी…

954

जळगाव: जळगावातील यावल-चोपडा रस्त्यावर खड्ड्यामुळे चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केन्हाळा व रावेर शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात पपई भरलेला टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील १२, केऱ्हाळा येथील २ आणि रावेर येथील २ असे १६ मजूरांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. यामुळे रावेर तालुक्यातील असल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास पपयांचा ट्रक पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. यावल-चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे निघाला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांवर मजूर बसले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते. हे खड्डे चकवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक पलटी झाल्याचे काही प्रथमदर्शींनी सांगितलं.

या दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग आला. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.