चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५०० कंत्राटी कामगारांचे कुटुंबियांसह डेरा आंदोलन…

425

चंद्रपूर- चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांना मागील सात महिने महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत.त्याचप्रमाणे कामगारांना दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन प्रत्यक्षात अजून पावेतो लागू झालेले नाही.थकीत पगार तातडीने देण्यात यावा तसेच किमान वेतन लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी सर्व कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून जन विकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळांसह डेरा आंदोलन सुरू केलेले आहे.

जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पगार जमा होत नाही व किमान वेतन वेतन लागू होणार नाही तोपर्यंत सर्व कामगार आपल्या कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच डेरा मांडून बसणार आहेत.या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून सर्व महिला कामगार सुद्धा दिवस-रात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडणार आहेत.

कामगार स्वतः आंदोलनस्थळी भोजन तयार करणार आहेत.तसेच रात्रीसुध्दा परिवारास तिथेच मुक्काम करणार असल्याची माहिती जन विकास कामगार संघाचे पदाधिकारी राहुल दडमल,सतिश येसांबरे,ज्योती कांबळे यांनी दिलेली आहे.

दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांच्या आईचे आज निधन झाल्याची माहिती जन विकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना मिळाली.यानंतर सर्व कामगारांनी आंदोलनस्थळी दोन मिनिटाचे मौन पाळून अधिष्ठाता डॉ.हुमणे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली, हे सत्य असले तरी ही लढाई मुद्द्याची आहे. अधिष्ठाता यांच्या मातोश्रीचे निधन झाले, ही दुःखद बाब आहे.त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली.