HomeBreaking Newsबल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल ऑलिंम्‍पीक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे यासाठी विनंती करणार...

बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल ऑलिंम्‍पीक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे यासाठी विनंती करणार – क्रिडामंत्री सुनिल केदार

2024 मध्‍ये होणा-या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त खेळाडू तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने तज्‍ज्ञांकरवी प्रशिक्षण व अन्‍य बाबींसाठी चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल रिलायन्‍स फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे यासाठी राज्‍य सरकार रिलायन्‍स फाऊंडेशनला विनंती करेल तसेच बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलाला भारतीय क्रिडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्‍हणून मान्‍यता मिळावी यासाठी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री किरण रिजीजु यांना सुध्‍दा आपण विनंती करणार असल्‍याचे आश्‍वासन राज्‍याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी दिले.

मिशन शक्‍ती अंतर्गत बल्‍लारपूर येथील तालुका क्रिडा संकुल येथे 2024 च्‍या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेच्‍या तयारीसाठी सेंटर फॉर एक्‍सेलन्‍स सुरू करण्‍यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनसोबत करार करण्‍याच्‍या विषयासंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मंत्रालयात क्रिडा मंत्री सुनिल केदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित जिल्‍हयांमधले खेळाडू 2024 मध्‍ये होणा-या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने मिशन शक्‍ती या उपक्रमांतर्गत अत्‍याधुनिक क्रिडा विषयक सुविधांनी परिपूर्ण असे बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल बांधण्‍यात आले. या तालुका क्रिडा संकुलाची देखभाल व दुरूस्‍ती तसेच खेळाडू प्रशिक्षणासाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे तज्ञ प्रशिक्षक उपलब्‍ध व्‍हावे यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे, अशी विनंती रिलायन्‍स फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती निता अंबानी यांच्‍याकडे आपण केली असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. गेल्‍या 120 वर्षात ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेत भारताला केवळ 28 पदके मिळाली असून यात फक्‍त 9 सुवर्ण पदकांची नोंद आहे. अमेरिकेला 2520, चीनला 543, ग्रेट ब्रिटेनला 847, सोवियत युनियनला 1122, जर्मनीला 937, फ्रांन्‍सला 713 पदके प्राप्‍त झाली आहेत. भारताला मिळालेल्‍या पदकांची संख्‍या या तुलनेत नगण्‍य आहे. हे प्रमाण वाढावे व आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित असलेल्‍या चंद्रपूर, गडचिरोली जिल्‍हयातील खेळाडू पदकप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनला हे स्‍टेडियम दत्‍तक देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले.

येत्‍या सोमवारी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री महाराष्‍ट्राच्‍या दौ-यावर येत आहेत. या दौ-यादरम्‍यान बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलाला भारतीय क्रिडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्‍हणून मान्‍यता मिळावी यासाठी आपण त्‍यांना विनंती करणार असल्‍याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी यावेळी सांगीतले. तसेच या तालुका क्रिडा संकुलाच्‍या वसतीगृहाची संरक्षक भिंत, सोलार सिस्‍टीम यासाठी त्‍वरीत अंदाजपत्रक सादर करावे, आपण यासाठी प्राधान्‍याने निधी उपलब्‍ध करून देवू, असेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.

बैठकीला क्रिडा आयुक्‍त श्री. बकोरीया, नागपूरचे क्रिडा उपसंचालक, जिल्‍हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!