Homeराज्यवीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष

वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष

वेबिनार व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार

नागपूर ,दि. २६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.

महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये माहे जून २०२० महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल. तसेच शहरी भागात मोठमोठ्या रहिवाशी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-19 संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.  यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यास्तरावर  ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.

याशिवाय परिमंडल अंतर्गत जिल्हा पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी तात्काळ भेट घेऊन त्यांना माहे जून 2020 महिन्याच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. हे वीजबिल रीडिंगनुसार अचूक आहे तसेच वीजग्राहकांवर एकाही पैशाचा भुर्दंड पडलेला नाही याबाबत सविस्तरपणे लोकप्रतिनिधींना समजून सांगण्यात येणार आहे.

महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत सोशल मीडियावरून मेसेजद्वारे अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र ग्राहकांनी या मेसेजवर विश्वास ठेऊ नये. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/  या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहणे सोयीचे झाले आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक  वीजग्राहकांना पाठविली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.  यासोबतच वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!