उघड्या नाल्याने घोटकर हैराण; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला
मुख्य रस्त्यालगतचा नाला ठरतोय वाहनधारकांसाठी डोकेदुखी
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
घोट येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेला नाला अनेक दिवसांपासून उघडाच असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यावर संरक्षणात्मक झाकण किंवा सिमेंट स्लॅब नसल्यामुळे वारंवार वाहनांचे चाक नाल्यात अडकत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने ये-जा करतात. विशेष बाब म्हणजे याच मार्गावर पेट्रोल पंप देखील असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या नाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नुकत्याच घडलेल्या घटनेत एका मालवाहू वाहनाचे चाक थेट नाल्यात अडकल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ नाल्यावर मजबूत झाकण बसवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी जोर धरत आहे.
“प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.








