Home Breaking News महामंडळाची बस रस्त्यात पंचर; अतिरिक्त टायर व जॅक नसल्याने प्रवाशांची गैरसोय…

महामंडळाची बस रस्त्यात पंचर; अतिरिक्त टायर व जॅक नसल्याने प्रवाशांची गैरसोय…

140

महामंडळाची बस रस्त्यात पंचर; अतिरिक्त टायर व जॅक नसल्याने प्रवाशांची गैरसोय


प्रतिनिधी गौरव बुरांडे |

दि.१२ फेब्रुवारी २०२६
गडचिरोली आगाराची कसनसूर–रेगडी–गडचिरोली Mh 07C9368 ही एस.टी. बस आज सकाळी कसनसूर येथून प्रवासी घेऊन नियोजित वेळेत निघाली. मात्र रेगडी जवळ पोहोचताच बसचा टायर पंचर झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
बस पंचर झाल्यानंतर चालकाकडून तत्काळ चक्का बदलून प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. परंतु बसमध्ये अतिरिक्त टायर, जॅक व पाना उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे बस रस्त्याच्या मधोमधच उभी राहिली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
विशेष म्हणजे, या बसमधून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे बोर्डाचे पेपर असल्याने त्यांची धावपळ उडाली. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनांची शोधाशोध करावी लागली. इतर प्रवाशांनाही कामानिमित्त गडचिरोलीकडे जाणे आवश्यक असल्याने त्यांचीही तारांबळ उडाली.
या घटनेमुळे एस.टी. महामंडळाच्या देखभाल व तपासणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघणाऱ्या बसमध्ये आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असणे गरजेचे असताना ती नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व वेळेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित आगार प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बसची नियमित तपासणी करावी व भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Don`t copy text!