Home Breaking News त्या चकमकीतील मोठी बातमी समोर;प्रभाकरसह ७ जहाल माओवादी ठार, एक जवान शहीद…

त्या चकमकीतील मोठी बातमी समोर;प्रभाकरसह ७ जहाल माओवादी ठार, एक जवान शहीद…

560

अबुजमाडमध्ये मोठे यश : प्रभाकरसह ७ जहाल माओवादी ठार, एक जवान शहीद

जिल्हा संपादक नितेश खडसे
अबुजमाड परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय (माओवादी) संघटनेच्या कंपनी क्रमांक १० चा प्रभारी प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याच्यासह एकूण ०७ जहाल माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रभाकर याच्यावर शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
काल रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून ०३ माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभर सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान आणखी ०४ माओवाद्यांचे मृतदेह (०२ पुरुष व ०२ महिला) हस्तगत करण्यात आले. या अभियानाच्या अखेरीस एकूण ०७ माओवाद्यांचे मृतदेह (०४ पुरुष व ०३ महिला) पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. तसेच घटनास्थळावरून ०३ AK-47, ०१ SLR व ०१ .303 रायफल अशी एकूण ०५ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, या तीव्र चकमकीदरम्यान सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८, रा. अहेरी, मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी) यांनी शौर्याने लढा देत ०२ माओवाद्यांना ठार केले. मात्र चकमकीदरम्यान त्यांना गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याच अभियानादरम्यान जवान जोगा मडावी (रा. किष्ट्यापल्ली) यांनाही गोळी लागून दुखापत झाली होती. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने गडचिरोली येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते सध्या धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मृत माओवाद्यांची ओळख व अभियानासंदर्भातील सविस्तर माहिती गडचिरोली पोलीस उद्या आयोजित पत्रकार परिषदेत देणार आहेत.

Don`t copy text!