आनंद निकेतन महाविद्यालयास विदेशातील पाहुण्यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा/ दि २९-०१-२०२६
महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात फ्रान्स, जर्मनी व इटली येथील विदेशी अभ्यागतांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रामुख्याने आनंदवन प्रकल्पास भेट देऊन तेथील विविध उपक्रम तसेच नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरण संरक्षण व संवर्धन आदींची सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकासभाऊ आमटे यांची भेट घेऊन विशेष चर्चा केली.
यानंतर विदेशी अभ्यागतांनी महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, इयत्ता अकरावी–बारावी, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. महाविद्यालयातील विविध शैक्षणिक तसेच विविध विस्तार उपक्रमांची माहिती घेत त्यांनी संपूर्ण विभाग तसेच प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळांना प्रत्यक्ष भेट दिली. या महाविद्यालयात वरोरा परिसरातील ग्रामीण विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती जाणून घेताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबाबत त्यांनी विशेष रस दाखविला.
या प्रसंगी आनंदवनातील अतिथी समन्वयक व योग शिक्षक श्री दीपक शिव यांनी विदेशी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अरविंद बरडे व डॉ. प्रशांत वाघ यांनी विदेशी पाहुण्यांना महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठ स्तरावरील पुरस्कार प्राप्त महाविद्यालय, पुरस्कृत विद्यार्थी, शिक्षक व सहकारी कर्मचारी, क्रीडा प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच शैक्षणिक गुणवत्ता आदिबाबत समाधान व्यक्त केले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व ग्रंथपाल डॉ. संजय साबळे यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. रामदास कामडी, प्रा. तिलक ढोबळे, प्रा. हेमंत परचाके, अधिक्षक देवानंद अलोणे, वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे, ग्रंथालय लिपिक मनीषा मनगटे तसेच कार्यालयीन कर्मचारी हिना पांडे, संतोष गुंतीवार, चेतन नागदेवते, संकेत कायरकर, निखिल डुकरे, हर्षल लंगडे यांच्यासह विविध शाखांचे प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला व विद्यार्थ्यांची मनोगते जाणून घेतली.







