शासकीय आश्रमशाळा लाहेरी येथे अन्नविषबाधा (Food Poisoning); ४४ विद्यार्थी बाधित, २ अहेरी येथे रेफर
प्रतिनिधी रविंद्र सदमवार
लाहेरी ता. भामरागड
तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा लाहेरी येथे आज दुपारच्या जेवणानंतर अन्नविषबाधा (Food Poisoning) झाल्याची गंभीर घटना घडली. शाळेतील एकूण ४४ विद्यार्थ्यांना शाळेतील जेवणामुळे अन्नविषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दुपारचे जेवण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी व चक्कर येणे अशी लक्षणे अचानक दिसून आली. वैद्यकीय तपासणीत ही लक्षणे अन्नविषबाधेचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर तातडीने विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. १५ विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) दाखल करण्यात आले, तर उर्वरित विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, प्रकृती गंभीर असलेल्या २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभाग व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले. सध्या सर्व विद्यार्थी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेत असून बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे शाळेतील भोजन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.







