भामरागड तालुक्यातील दोन प्रमुख रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची शिवसेनेची मागणी.
प्रतिनिधी/कवीश्वर मोतकुरवार:
भामरागड तालुक्यातील घोटपाडी ते कवंडे तसेच हिदूर ते गुंडूरवाही हे दोन अत्यंत महत्त्वाचे रस्ते मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी जीवघेण्या अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे सहा किलोमीटर लांबीचा घोटपाडी–कवंडे रस्ता तसेच हिदूर–गुंडूरवाही रस्ता पूर्णपणे उखडलेले असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे अक्षरशः धोक्याचे झाले आहे.
या मार्गांवर अलीकडेच नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीत वाढ झाली आहे. मात्र रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर दोन्ही रस्ते महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याला जोडणारे महत्त्वाचे दळणवळणाचे मार्ग असून दुर्गम व अतिसंवेदनशील भागातील नागरिकांसाठी हेच एकमेव संपर्काचे साधन आहे. मात्र रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन विकासाच्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र आदिवासी व दुर्गम भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना तालुका अध्यक्ष सुधाकर तीम्मा यांचा कडून मांडण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मा. तहसीलदार, भामरागड यांच्याकडे तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली असून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन काम सुरू करावे, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त होत आहे.







