
वरोरा शहर प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा : वरोरा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. वरोरा नगर परिषद निवडणुकीत माय–बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर श्री शिवाजी महाराज सभागृहात पदग्रहण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवक–नगरसेविकांचाही गौरव करण्यात आला.
या पदग्रहण समारंभाला प्रमुख उपस्थिती लावताना उपस्थित मान्यवरांनी सौ. अर्चना ठाकरे यांचे अभिनंदन केले. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आपल्या पहिल्याच भाषणात नगराध्यक्षा सौ. अर्चना ठाकरे म्हणाल्या, “नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. वरोरा शहर स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने ठोस पावले उचलली जातील.”
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शहराचा सर्वांगीण विकास अद्याप पूर्ण झालेला नाही. सत्ताधारी–विरोधी असा भेद न करता सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. वरोऱ्यासाठी ठोस विकास आराखडा तयार केला जाईल.”
या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जाहीर समर्थन दिल्याने नगर परिषदेत सत्ता स्थापन झाली आहे.
कार्यक्रमात अहेतेशाम अली, विलास नेरकर, मिलिंद भोयर, प्रशांत काळे, विलास टिपले, यशोदा खामणकर, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, बाबा भागडे यांच्यासह श्री. आशिष ठाकरे व श्री. प्रदीप बुरान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी वरोरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन मेश्राम (गटनेता), बंडू देऊळकर, राहुल देवळे, मनीष जेठानी, अनिल झोटिंग, खेमराज कुरेकार, सुष्मा चांभारे, रोशनी भडके, मंगला पिंपळकर, कुणाल रुयारकर, अभय ठावरी, गजानन जिवतोडे, योगिता नेरकर, तेलतुमडे मॅडम, राजकुमार खंडारे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.







