“शेतीतून श्रीमंती शक्य; सेंद्रिय शेती व मत्स्यव्यवसायाकडे वळण्याचे आवाहन” – मनरेगा कमिशनर नंदकुमार

89

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार! इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल
भामरागड :
अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान (BRLF) यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा रूरल असोसिएशन, भामरागड यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या उपजीविका विकास अंतर्गत शेतकऱ्यांच्या पारंपरिक उपजीविकेच्या साधनांना आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न, सेंद्रिय शेतीचा अवलंब, उत्पन्नाची साधने वाढविणे, शेतीतील खर्च कमी करणे व तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर देण्यात येत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत भामरागड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील ८६ गावांमध्ये अती उच्च प्रभावीत मेगा वॉटरशेड प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत पल्ली येथे मनरेगा कमिशनर नंदकुमार यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी पल्ली गावात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत मार्गदर्शन करताना मनरेगा कमिशनर नंदकुमार यांनी, “शेतकरी जर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवडीसोबत मत्स्यव्यवसायाकडे वळले, तर त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊन शेतकरी निश्चितच आर्थिकदृष्ट्या सक्षम व श्रीमंत होऊ शकतो,” असे स्पष्ट केले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी मागील दोन वर्षांपासून युवा रूरल असोसिएशनकडून सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी तांत्रिक मदत व साहित्य वितरण मिळालेल्या पल्ली येथील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जीजगाव येथील आधुनिक पद्धतीने मिश्र शेती करणारे शेतकरी मनोज पोरतेट यांच्या शेताला भेट देऊन समाधान व्यक्त केले व पुढील काळात उत्पन्न वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. याशिवाय जीजगाव येथील मामा तलावास भेट देऊन या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सभेप्रसंगी पल्ली गावात उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना चेतना लाटकर यांनी केली, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पल्ली ग्रामवासीयांनी केले.
या कार्यक्रमाला पल्लीचे सरपंच मनोज पोरतेड, राज्य गुणवत्ता अधिकारी शहाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत, येरमे नायब तहसीलदार (EGS) गडचिरोली, कुंभारे, किशोर बागडे (तहसीलदार भामरागड), गोंगले (बीडीओ भामरागड), कुणाल राऊत (कृषी तालुका कार्यालय भामरागड), मेश्राम (बीडीओ मनरेगा), पुरस्कृत शेतकरी सीताराम मडावी, ग्रामसेवक तोकलवार, पल्ली महिला बचत गट, BRLFच्या चेतना लाटकर (उपजीविका समन्वयक, नागपूर), शुभम पटले (जिल्हा क्षेत्रीय समन्वयक, गडचिरोली), युवा रूरल असोसिएशनचे CEO देवराज सर, टीम लीडर अजय गावडे यांच्यासह संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होती.