एटापल्लीच्या शहरी शेतकऱ्यांना जिल्हा खनिकर्म योजने अंतर्गत लाभ द्या – नगरपंचायतीची ठाम मागणी…

89

नगराध्यक्ष रेखा मोहूर्ले यांचा पुढाकार, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांची ठोस मांडणी

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार | इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल

नगरपंचायत एटापल्ली (शहरी) क्षेत्रातील शेतकऱ्यांना जिल्हा खनिकर्म निधी अंतर्गत कृषी उपकरणे व साहित्याचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी नगरपंचायत एटापल्लीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व नगराध्यक्ष रेखा मोहूर्ले यांनी केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असताना, 23 एप्रिल 2015 रोजी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यापासून एटापल्ली शहरातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण व शहरी शेतकरी एकसारखीच शेती करीत असताना शहरी शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय दूर करण्यात यावा, अशी ठाम भूमिका नगरपंचायतीने मांडली.
या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी बांधकाम सभापती व नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी शहरी शेतकऱ्यांची वस्तुस्थिती सविस्तरपणे मांडली.
“एटापल्ली शहर हे पूर्वी ग्रामपंचायत होते. आजही शहरातील शेतकरी ग्रामीण भागाप्रमाणेच शेती करतात. शेतीची पद्धत, खर्च व अडचणी सारख्याच असताना ग्रामीण व शहरी शेतकऱ्यांत दुजाभाव का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, शहरी शेतकरी दहा वर्षांपासून योजनांपासून वंचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संपूर्ण माहिती संकलित करून जिल्हाधिकारी महोदयांकडे शहरी शेतकऱ्यांनाही जिल्हा खनिकर्म योजने अंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन सादर करताना निर्मला कोंडबतुलवार (बांधकाम सभापती), नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक राहुल कुळमेथे, नगरसेविका शालिनी करमरकर, नगरसेविका कविता रावलकर व नगरसेविका जाणो गावडे उपस्थित होते.

नगराध्यक्ष रेखा मोहूर्ले यांनी शहरी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक स्थिती बळकट करणे व कृषी उत्पादनक्षमतेत वाढ करणे हा या मागणीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तर नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी शहरी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला.