अहेरी–एटापल्ली–बोलेपल्ली बस उशिरा धावल्याने विद्यार्थ्यांचे हाल…

78

नगराध्यक्ष रेखा मोहूर्ले व नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या स्वाक्षरीसह राजमुद्रा फाउंडेशनची तक्रार

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्ली : मानव विकास मिशनची अहेरी–एटापल्ली–बोलेपल्ली बस संध्याकाळच्या वेळेत सतत उशिरा धावत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात राजमुद्रा फाउंडेशन एटापल्लीतर्फे अहेरी आगार प्रमुखांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारीवर नगराध्यक्ष मा. रेखा मोहूर्ले व नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी स्वाक्षरी करून अधिकृत पाठिंबा दर्शवला आहे.

फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत मामीडवार यांनी या बससेवेचे विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्त्व अधोरेखित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे—
विद्यार्थी सकाळी वेळेत शाळेत पोहोचतात,
परंतु संध्याकाळची बस वेळेत न आल्यामुळे रात्री 8 ते 9 वाजता घरी पोहोचण्याची वेळ येते. ग्रामीण आणि जंगल परिसरातून अंधारात प्रवास करावा लागतो, विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अभ्यास, गृहपाठ, विश्रांती या सर्व गोष्टींचा समतोल बिघडतो. पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीची तीव्र चिंता भेडसावते.

राजमुद्रा फाउंडेशनच्या मागण्या

1. संध्याकाळची बस निर्धारित वेळेत चालवावी.

2. बस उशिरा येण्यामागील कारणांची तातडीने चौकशी करावी.

3. आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांसाठी विशेष बस उपलब्ध करावी.

4. हा मार्ग प्राधान्याने नियमित करावा.

 

नागरिकांचे लक्ष आगार प्रशासनाकडे

ही तक्रार औपचारिकरित्या दाखल झाल्यानंतर बससेवेतील अडथळे दूर करण्यासाठी परिवहन विभाग कोणती पावले उचलतो, याकडे नागरिक व पालकांचे लक्ष लागले आहे.

अहेरी–एटापल्ली–बोलेपल्ली बसमार्ग हा विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक आहे. रोज रात्री उशिरा विद्यार्थ्यांना अंधारात जंगलातून प्रवास करावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुलींच्या सुरक्षेचा धोका वाढत असून पालकांमध्ये तीव्र चिंता आहे. ही बस निर्धारित वेळेत धावणे अत्यावश्यक आहे. आमच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, हीच आमची ठाम मागणी आहे.”
— अनिकेत मामीडवार, अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक, नगरपंचायत एटापल्ली