तालुका प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा
वरोरा तालुका, बोर्डा — शांतीनगर क्र. १ परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार श्री. करण देवतळे साहेब यांनी येथील पाटील यांच्या घरापासून ते प्रतीक एजन्सीपर्यंतच्या सी.सी. रस्ता बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास तातडीने होकार दर्शविला आहे.
या रस्त्याच्या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेली गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार साहेबांना या रस्ता बांधकामासाठी निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत देवतळे साहेबांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाशी चर्चा केली. निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असून रस्त्याचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवेदन देण्यासाठी झालेल्या भेटीवेळी शांतीनगर क्र. १ मधील डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासह वॉर्डातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. स्थानिक विकासकामास गती मिळावी या हेतूने नागरिकांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही मान्यवरांनी सांगितले.
सी.सी. रस्ता बांधकामाची मागणी मंजूर झाल्याने शांतीनगर परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण असून आमदार देवतळे यांच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले जात आहे.







