रेगडी विश्रामगृहाची दुरवस्था कायम; नक्षलवाद्यांच्या जाळपोळीला अनेक वर्षे उलटूनही दुरुस्ती नाही…

137

प्रतिनिधी गौरव बुरांडे
रेगडी येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीला अनेक वर्षे उलटून गेली असली, तरीही त्या इमारतीची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे एक महत्वपूर्ण सरकारी सुविधा वापरात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काळात नक्षलवादी गतिविधींमध्ये या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने इमारत पूर्णपणे उध्वस्त अवस्थेत आहे.

रेगडी हे पर्यटनदृष्ट्या तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र असून येथे दररोज अनेक पर्यटक, अधिकारी व राजकीय नेत्यांची ये-जा असते. परंतु इथे एकही सक्षम विश्रामगृह उपलब्ध नसल्याने पाहुण्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी शासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रेगडी येथील विश्रामगृहाची दुरुस्ती अथवा नवीन इमारत उभारण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रश्न अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

स्थानिकांची प्रतिक्रिया

रेगडी येथील पाटबंधारे विभागाचे विश्राम गृहात पूर्वीच्या काळात अनेक राजकीय नेते बैठका घ्यायचे आणि वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी येथे येऊन मुक्काम करायचे मात्र मागे नक्षल कडून याची जाळपोळ करण्यात आली त्यानंतर अजूनही याच्या दुरुस्ती कडे कोणाचेच लक्ष नाही तरी पाटबंधारे विभागाने याकडे त्यावरीत लक्ष दिले पाहिजे व नवीन विश्राम गृहाची बांधणी केली पाहिजे – बाजीराव गावडे माजी सरपंच रेगडी