संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर :
मानवतावादी कार्य आणि व्यसनमुक्तीच्या दिशेने देशभरात कार्यरत असलेल्या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज चंद्रपूरमध्ये भव्य शुभारंभ झाला. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “व्यक्तीच्या जीवनात जेव्हा आव्हाने उभी राहतात, तेव्हा ती पेलण्याचे सामर्थ्य निर्माण करणारी संघटना म्हणजे अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस. या संघटनेचे कार्य हे धर्म, वर्ग, भाषा किंवा प्रांत यांच्या पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून उभे करण्याचे आहे.”
विजयपथ समूहाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनानिमित्त चंद्रपूर येथे आयोजित या अधिवेशनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. वासुदेव गाडेगोणे होते.
आपल्या भावनिक आठवणी सांगताना डॉ. दिक्षित म्हणाले, “मद्यपान हा आजार मी लहानपणीच जवळून पाहिला आहे. वडिलांचा मृत्यू व दोन्ही काकांचे अकाली निधन हे मद्यपानामुळेच झाले.” हा अनुभव सांगताना ते क्षणभर भावूकही झाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गाडेगोणे म्हणाले, “आनंद म्हणून घेतली जाणारी दारू कधी स्वतःचा आणि कुटुंबाचा नाश करेल हे कधीच समजत नाही. मद्याधीनतेमुळे स्वतःवर नियंत्रण नसणे ही अत्यंत वेदनादायक स्थिती आहे.”
ते पुढे म्हणाले, “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस ही संघटना अपेक्षाविरहित सेवा देत असहाय्य व्यक्तींना नवजीवन देण्याचे काम करते. रात्री होणाऱ्या अपघातांमध्ये दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांचे कारण मद्यपान असते—ही समाजातील मोठी शोकांतिका आहे. अशा समस्येवर उपाय शोधण्यासाठी ए.ए. सारखी संघटना आशेचा किरण आहे.”
विजयपथ समूहाने राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. गाडेगोणे यांनी समूहाचे अभिनंदन केले.
या प्रसंगी डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांना मेमेन्टो उत्तम ए. यांनी, तर डॉ. गाडेगोणे यांना सुनील एन. यांनी प्रदान केला. देशभरातून आलेले सुमारे एक हजार ए.ए. व अल-Аनॉन सदस्य या अधिवेशनात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन बंडू के. यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील एन. यांनी मानले.







